मंडळांच्या थेट संपर्कात येणार एफडीए
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 10:14 PM2017-09-25T22:14:37+5:302017-09-25T22:15:11+5:30
महाप्रसाद वितरणासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे (एफडीए) नोंदणी करणे अनिवार्य आहे.
कपिल केकत। लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : महाप्रसाद वितरणासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे (एफडीए) नोंदणी करणे अनिवार्य आहे. पण माहितीअभावी मंडळांकडून नोंदणी केली जात नाही. यासाठी मंडळांत जनजागृती करून महाप्रसाद नोंदणीसाठी त्यांना आवाहन व प्रोत्साहित करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने आता थेट मंडळांच्या संपर्कात येणार आहे. यासाठी शहरात कार्यशाळा आयोजित करुन मंडळ, मिष्ठान्न व्यवसायी व हॉटेल्सचालकांना मार्गदर्शन करणार आहे.
गणपती व दुर्गा उत्सवाची जिल्ह्याची परंपरा काही वेगळी आहे. यातही गोंदिया शहरातील दुर्गा उत्सवाची सर्वत्र ख्याती आहे. लगतच्या छत्तीसगड व मध्यप्रदेश राज्यातील लोकांची पावलेही या दोन उत्सवांत आपसूकच गोंदियाकडे खेचली जातात. बाहेरून येणाºया भाविकांची सोय व्हावी, या हेतूने मंडळांकडून महाप्रसादाचे वितरण केले जाते. त्यातही दुर्गाउत्सवात तर प्रत्येक मंडळाकडून महाप्रसाद वितरीत केला जातो. महाप्रसाद वितरणातून पुण्य कमविण्याचे हे सत्कार्य होत असले तरीही महाप्रसादातून विषबाधा झाल्यासारखे प्रकारही ऐकीवात येतात. यामुळे महाप्रसाद वितरणासाठी मंडळांना अन्न व औषध प्रशासनाकडे नोंदणी करून परवानगी घेणे बंधनकारक आहे. उत्सव साजरा करताना पोलीस विभाग व वीज वितरण कंपनीची परवानगी घेणे गरजेचे असतानाच महाप्रसादासाठी अन्न व औषध प्रशासनाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र विभागाकडून काहीच कारवाई होत नसल्याने मंडळांना याबाबत अद्याप माहिती नाही. यासाठी मात्र शासकीय नियमांची पायमल्ली केली जात आहे. त्यामुळे पोलीस व वीज वितरण कंपनीची परवानगी जशी बंधनकारक आहे तशीच अन्न व औषध प्रशासनाची परवानगी घेणे बंधनकारक असल्याबाबतची जनजागृती करवून देण्यासाठी विभाग थेट मंडळांच्या संपर्कात येणार आहे. यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून लवकरच कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यशाळेत विभागाचे अधिकारी मंडळांसह मिष्ठान्न व्यवसायी व हॉटेल्सचालकांना मार्गदर्शन करणार आहेत.
स्लाईड-शोमधून मार्गदर्शन
अन्न व औषध प्रशासनाकडून येथील गणपती व दुर्गा उत्सव मंडळांसह मिष्ठान्न व्यवसायी व हॉटेल्सचालकांची एक कार्यशाळा आयोजीत केली जाणार आहे. या कार्यशाळेत विभागाचे अधिकारी त्यांना स्लाईड-शोच्या माध्यमातून मिठाई किंवा प्रसाद तयार करताना घ्यावयाची खबरदारी, स्वच्छता, वापरण्यात येणारा पदार्थ आदि महत्वपूर्ण बाबींवर मार्गदर्शन करणार आहे. आता दुर्गा उत्सवाच्या दृष्टीकोणातून याला जरी उशीर होत असला तरी पुढील वर्षासाठी मात्र हा प्रयोग उपयोगी ठरेल.
मनुष्यबळाचा अभाव
अन्न व औषध विभागाचे येथे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. मात्र कार्यालयात मनुष्यबळ नसल्याने आताही भंडारा येथूनच सर्व कारभार हाकला जात आहे. परिणामी जिल्ह्यात पाहिजे त्या प्रमाणात लक्ष देता येत नाही व येथे सर्वांना रान मोकळे आहे. परवानगी घेतली किंवा नाही घेतली याचे काहीच फरक पडत नसल्याचे चित्र आहे.