आंतरजातीय विवाह केल्याबद्दल दंड ठोठावणाऱ्यांविरुद्ध गोंदियात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 06:59 PM2018-05-22T18:59:41+5:302018-05-22T18:59:49+5:30
गावातील लोकांवर सामाजिक बहिष्कार टाकण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून हजारो रुपये वसूल करणाऱ्या किन्ही येथील मरार समाज समितीच्या चार पदाधिकाऱ्यांवर रावणवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : गावातील लोकांवर सामाजिक बहिष्कार टाकण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून हजारो रुपये वसूल करणाऱ्या किन्ही येथील मरार समाज समितीच्या चार पदाधिकाऱ्यांवर रावणवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
गोंदिया तालुक्याच्या किन्ही येथील दिगंबर मेतलाल खरे याने याने सन २०११ मध्ये वर्धा जिल्ह्यातील एका दलित समाजाच्या मुलीसोबत आंतरजातीय विवाह केला. तो मुंबईला शिक्षक म्हणून काम करताना मुंबई येथे एका तरूणीच्या संपर्कात आल्यामुळे त्याने आंतरजातीय विवाह केला. ती सुध्दा मुंबईला शिक्षक म्हणून कार्यरत आहे. या आंतरजातीय विवाहामुळे गावातील मरार समाज सेवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिगंबरच्या कुटुंबियांवर सामाजिक बहिष्कार टाकण्याची धमकी दिली. मरार समाज समितीने ६ जून २०११ ला घेतलेल्या बैठकीत खरे कुटुंबियांकडून या आंतरजातीय विवाहाचे दंड म्हणून ६१ हजार रुपये घेण्यात आले. दंड दिल्यानंतर गावातील लोक त्यांच्यासोबत बोलचाल करून लागले. सन २०१७ मध्ये दिगंबरची आजी मरण पावली तिच्या मृत्यूची बातमी खरे कुटुंबियांनी इसुलाल कहनावत याला दिली नाही, म्हणून त्याच्याकडून ११०० रुपये पुन्हा दंड घेण्यात आला. या प्रकाराला कंटाळलेल्या दिगंबरचा भाऊ बुनेंद्रकुमार मेतलाल खरे (२७) याने या संदर्भात रावणवाडी पोलिसात तक्रार केली. खरे कुटुंबियांवर सामाजिक बहिष्कार टाकण्याच्या नावावर त्यांच्याकडून ६२ हजार १०० रुपये दंड घेणाऱ्या चौघांवर रावणवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सन २०११ मध्ये बुनेंद्रकुमार यांच्या भावाने आंतरजातीय विवाह केला. त्यामुळे त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकण्याची धमकी देत दंड म्हणून ६२ हजार १०० रुपए वसूल करणाऱ्या आरोपी फत्तेलाल कहनावत (५८), सुंदरलाल कहनावत (५५), इसूलाल कहनावत व हंसराज खरे सर्व रा. किन्ही यांच्यावर भादंविच्या कलम ३८४, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस हवालदार दीपक पाटील करीत आहेत.
उत्पन्नावर ठरते दंडाची रक्कम
मरार समाज समितीने दंडाच्या नावावर गावातील लोकांकडून मोठ्या प्रमाणात वसूल केलेल्या रकमेचा हिशेबच नसल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली आहे. किती लोकांकडून किती दंड वसूल केले याची माहिती देण्यास समिती नाकारत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. समाजाविरूध्द एखाद्याने कृत्य केले त्यावर दंड आकारला जातो. परंतु हा दंड सर्वांना समान न आकारता त्या व्यक्तीच्या आर्थिक उत्पन्नानुसार दंड आकारत असल्याची माहिती आहे.
एका तरूणावर सामाजिक बहिष्कार
किन्ही येथील एका मरार समाजाच्या तरूणाने पोवार समाजातील एका तरूणीशी प्रेमविवाह केला त्यामुळे त्या तरूणावरही ३१ हजार रुपए दंड करण्यात आला. परंतु त्या तरूणाची आर्थिक परिसथिती हलाकीची असल्यामुळे त्याच्यावर मागील सहा महिन्यापासून बहिष्कार टाकण्यात आल्याची माहिती आता येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
तंटामुक्त समिती गप्प का?
महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती प्रेमविरांसाठी व आंतरजातीय विवाह करणाऱ्यांसाठी वरदान ठरली असल्याचे चित्र जिकडे-तिकडे उभे आहे. परंतु गोंदिया तालुक्याच्या किन्ही येथील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीने या प्रेमवीरांना मदत का केली नाही यावर चर्चा सुरू आहे. गावात सामाजिक सलोखा राखण्याचे काम करणाऱ्या तंटामुक्त गाव समितीने किन्ही गावातील बिघडलेल्या सामाजिक स्वास्थाकडे दुर्लक्ष केले आहे.