गोंदिया जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध - राजकुमार बडोले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2019 03:13 PM2019-01-26T15:13:04+5:302019-01-26T15:14:12+5:30
नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध घटकातील लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देवून त्यांच्या जीवनात परिवर्तन घडून येत आहे. शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करुन जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
गोंदिया - नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध घटकातील लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देवून त्यांच्या जीवनात परिवर्तन घडून येत आहे. शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करुन जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले. प्रजासत्ताक दिनाचा 70वा वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते कारंजा येथील पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर करण्यात आले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना ते बोलत होते.
पालकमंत्री बडोले म्हणाले की, आधुनिक भारताला मिळालेली सर्वात मोठी देणगी म्हणजे भारतीय राज्यघटना होय. या राज्यघटनेमुळेच देशाला लोकशाही व्यवस्था मिळाली आहे. समाजातील उपेक्षित आणि वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी, समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्यघटनेत विविध तरतुदी करण्यात आल्या आहे. पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळख असलेल्या आपल्या राज्याला अनेक संत समाजसुधारकांनी दिशा देण्याचे काम केल्याचे त्यांनी सांगितले.
समाजातील वंचित आणि दुर्बल घटकांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
''विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती देण्यात येत आहे. ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळालेला नाही अशा मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजना सुरु करण्यात आली आहे. मागासवर्गीय शेतकऱ्यांसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना, आदिवासी शेतकऱ्यांसाठी बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना सुरु करण्यात आली आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यात जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्या स्थापन करण्यात आली'',असेही त्यांनी सांगितले.
''शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून सन २०१८-१९ मध्ये धान पिकावर आलेल्या मावा तुडतुडा रोगामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ३८ कोटी १३ लक्ष रुपये वाटप करण्यात आले. जिल्ह्यातील तीन तालुक्यातील मध्यम स्वरुपाच्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना २४ कोटी ४७ लक्ष रुपये वाटप करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ८७ हजार २७६ शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज केले. त्यापैकी ८३ हजार ९७४ पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला असून शेवटच्या पात्र शेतकऱ्याला कर्जमाफीचा लाभ मिळेपर्यंत ही योजना सुरुच राहणार आहे'', असेही त्यांनी सांगितले.
जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून जलक्रांती घडण्यास मदत होत असल्याचे सांगून बडोले म्हणाले, सन २०१८-१९ या वर्षात १६५ गावांची निवड करण्यात आली असून गावांचे पाणलोट आधारीत गाव आराखडे तयार करण्यात आले आहेत. ३ हजार ८२ कामांचा ९४ कोटी ६२ लाखाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. ३ हजार ६२ कामांना आतापर्यंत प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. त्यापैकी ५७३ कामे सुरु करण्यात आली असून २७६ कामे पूर्ण झाली आहेत तर २९७ कामे प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी सांगितले.