अतिथंडीने धानाच्या वाफ्यांची वाढ खुंटली
By admin | Published: January 15, 2015 10:54 PM2015-01-15T22:54:55+5:302015-01-15T22:54:55+5:30
सध्या न्यूनतम तापमानात होत असलेली घट व थंडीचा वाढता कडाका यामुळे पिके प्रभावित होत आहेत. जिल्ह्यातील शेतकरी उन्हाळी भात पिकासाठी कामाला लागला असून वाफे टाकण्यात आले आहेत.
गोंदिया : सध्या न्यूनतम तापमानात होत असलेली घट व थंडीचा वाढता कडाका यामुळे पिके प्रभावित होत आहेत. जिल्ह्यातील शेतकरी उन्हाळी भात पिकासाठी कामाला लागला असून वाफे टाकण्यात आले आहेत. मात्र थंडीच्या कडाक्याने वाफे कोमजत असून त्यांची वाढ खुंटली आहे. परिणामी उत्पन्नात घट होण्याची शक्यता आहे.
थंडीमुळे पीक प्रफुल्लीत दिसण्याऐवजी अतिथंडीने कोमेजलेली दिसतात. रबी उत्पादनातही आता घट होणार असल्याने शेतकऱ्यांना चिंता सतावत आहे. यंदा संकटांची मालिका सुरू आहे. यामुळे बळीराजा पिचला आहे. पावसाचा विलंब, नंतर थोडा पाऊस, पुन्हा पावसाची दडी या दृष्ट चक्रामुळे शेतकरी तुटला आहे.
धान पिकाने दगा दिल्याने शेतकऱ्याने गहू, हरभरा, लाखोळी, जवस सारख्या जोड धान्यांतून भरपाई करण्याचा प्रयत्न केला. तर उन्हाळी बात विकासाठी धडपड सुरू केली आहे. सुमारे ४०० हेक्टर क्षेत्रात वाफे टाकण्यात आले आहेत. मात्र थंडीचा जोर वाढतच चालल्याने या वाफ्यांवरही प्रभाव जाणवत आहे. कृषी तज्ज्ञांनुसार या अतिथंडीमुळे वाफ्यांची वाढ खुंटते व तोच प्रकार जिल्ह्यात सुद्धा बघता येत आहे.
निसर्ग प्रत्येकवेळी शेतकऱ्यांसमोर विपरीत स्थिती निर्माण करीत आहे. इतकी संकटे कमी झाली म्हणून की काय अलीकडे थंडीची लाट तयार झाली आहे. तरिही थंडी व धुके यांचा सामना करीत शेतात पिके उभे आहे. जमिनीत पुरेसा ओलावा आहे. रासायनिक खते व किटकनाशकांच्या फवारण्या झाल्या आहेत.
अशावेळी तूर, गहू व चना ही पिके बहारदार असने अपेक्षित असते. मात्र थंडीने ही सर्वच पिके कोमेजलेल्या अवस्थेत दिसत आहे. शिवाय पिकांची वाढ खुंटली आहे. थंडी अशीच कायम राहिल्यास उभे पीक वाळण्याचा धोका निर्माण झाला आहे. (शहर प्रतिनिधी)