महिलांच्या पुढाकाराने अर्जुनी गावात दारूबंदी

By admin | Published: September 10, 2014 11:47 PM2014-09-10T23:47:58+5:302014-09-10T23:47:58+5:30

तिरोडा तालुक्यातील ग्राम अर्जुनी येथील महिलांच्या पुढाकाराने ग्रामसभेत ठराव मंजूर करून गावातील हातभट्टी व देशी-विदेशी दारूच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली. संपूर्ण गावात दारूबंदी

Ladakh in Arjuni village by women's initiative | महिलांच्या पुढाकाराने अर्जुनी गावात दारूबंदी

महिलांच्या पुढाकाराने अर्जुनी गावात दारूबंदी

Next

इंदोरा/बुज. : तिरोडा तालुक्यातील ग्राम अर्जुनी येथील महिलांच्या पुढाकाराने ग्रामसभेत ठराव मंजूर करून गावातील हातभट्टी व देशी-विदेशी दारूच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली. संपूर्ण गावात दारूबंदी करण्याचा संकल्प येथील महिलांनी घेतला आहे.
या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, अर्जुनी हे गाव तिरोडा तालुक्यात ग्रामीण भागातील मोठे, व्यापारी व व्यावसायीक गाव आहे. या गावाची लोकसंख्या अंदाजे सहा हजाराच्या वर असून चौकात शाळा, हायस्कूल, अंगणवाडी, कॉन्व्हेंट व मोठा व्यापार आहे. या गावात अनेक वर्षापासून दारू विकणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. दारूविक्रीमुळे अनेक कुटूंब उद्धवस्त झाली व तरुण पिढीसुद्धा दारूच्या आहारी गेली. प्रत्येक दिवशी सकाळ, संध्याकाळ दारूमुळे चौकात एकमेकांमध्ये भांडण तंटे व्हायचे. चौकात महिलांची वर्दळ असते. शाळा, बसस्थानक असल्यामुळे महिलांना दारू पिणाऱ्यांमुळे नेहमी त्रास होत असे. दारू विक्रेत्यांना पोलिसांचे अभय असल्यामुळे खुलेआम दारू विक्री केली जात असे.
२७ आॅगस्टच्या ग्रामसभेत गावातील २०० महिलांनी दारूबंदीचा ठराव मांडला होता. यानंतर तो ठराव ग्रामसभेतून सरपंच लता साकुरे यांच्या अध्यक्षतेखाली पारीत करून घेतला. ग्रामसभेत सर्वानुमते दारूबंदीचा ठराव पारीत करण्यात आला. त्या दिवसापासून गावात कोणीही दारू विकणार नाही व तसेच पिणाऱ्यांवरसुद्धा बंदी घालण्यात आली. गावात महिलांनी दारूबंदी समिती गठित केली. यात अध्यक्ष मीना पटले, उपाध्यक्ष सयन ठाकरे, सचिव प्रभा पटले व सदस्यांमध्ये ४४ महिलांची नियुक्ती करण्यात आली.
यानंतर गावातील दोनशे महिला एकत्र येवून संपूर्ण गावात दारूबंदीचा लाँगमार्च काढण्यात आला. दारू विकणाऱ्या व काढणाऱ्या व्यक्तींच्या घरी जाऊन महिलांनी ताकीद दिली. गावात कुणीही दारू विकणार नाही. जो विकताना मिळेल त्याची दारू जप्त करुन पोलिसांच्या ताब्यात दिले जाईल व दंड आकारण्यात येईल, असे सांगताच दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले. ज्या दारू विक्रेत्यांना पोलिसांचे अभय होते, त्यांनाही ताकीद करण्यात आली. दारूमुळे गावात जुगार, सट्टा अशा अवैध धंद्यांना ऊत आला होता. ते नष्ट करण्यासाठी महिलांनी एकत्र येवून दारूबंदीचा पवित्रा घेतला.
दारूबंदीमुळे गावात शांतता व सुव्यवस्था रहावी असे सांगत तंटामुक्त गाव समितीने व ग्रामपंचायत कमिटी, महिला मंडळांनी एकत्र येऊन सहकार्य करण्याचे आवाहन महिलांनी केले.
गाव व्यसनमुक्त करून गावात समृद्धी राहावी. विकास कामांना गती देण्यासाठी दारूबंदी होणे गरजेचे असल्याचे मत सरपंच लता साकुरे यांनी व्यक्त केले. महिलांनासुद्धा गावातील सर्व नागरिकांनी सहकार्य करण्याचे आश्वासनही केले. दारूबंदीमुळे युवकांमध्ये उत्साह निर्माण झाला असून तरुण पिढी या व्यवसायातून दूर राहील, अशी प्रतिक्रिया उपसरपंच महेंद्र बागळे यांनी व्यक्त केली.
दारूबंदीसाठी महिलांना ग्रा.पं.चा सहयोग राहील तसेच दवनीवाडा पोलिसांनीसुद्धा दारूबंदीसाठी महिलांना सहकार्य करून जो कुणी दारू विक्री करताना आढळेल त्याचवेळी गुन्हा दाखल करावे, अशी विनंती केली. सदर दारू बंदीच्या ठरावाच्या प्रति दवनीवाड्याचे ठाणेदार, पोलीस अधीक्षक गोंदिया व गुन्हे अन्वेषण विभाग गोंदिया यांना पाठविण्यात आल्या आहेत. महिलांमध्ये चयन ठाकरे, किरण साठवणे, किरण माने, दुर्गा साकुरे, संगिता रंगारी, भीमा गणवीर आदी महिलांनी पुढाकार घेतला. (वार्ताहर)

Web Title: Ladakh in Arjuni village by women's initiative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.