शहरवासीयांना दिला स्वच्छतेचा मंत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 09:00 PM2018-01-28T21:00:53+5:302018-01-28T21:01:05+5:30
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छता सर्वेक्षण-२०१८ चा काऊंट डाऊन सुरू झाला असून यासाठी सर्वच नगर परिषदा कामाला लागल्या आहेत. त्यांतर्गत गोंदिया नगर परिषदेने शहरात ठिकठिकाणी जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करून शहरवासीयांना स्वच्छतेचा मंत्र देण्यास सुरूवात केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छता सर्वेक्षण-२०१८ चा काऊंट डाऊन सुरू झाला असून यासाठी सर्वच नगर परिषदा कामाला लागल्या आहेत. त्यांतर्गत गोंदिया नगर परिषदेने शहरात ठिकठिकाणी जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करून शहरवासीयांना स्वच्छतेचा मंत्र देण्यास सुरूवात केली आहे. सोबतच स्वच्छता अॅपबाबत माहिती देत ते डाऊनलोड करून देण्यात आले.
स्वच्छता हीच समृद्धी, आरोग्य व सन्मानाची कुंजी असल्याचे देशवासीयांना भासवून देण्यासाठी स्वच्छ भारत मिशन राबविले जात आहे. आता स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छता सर्वेक्षण-२०१८ ची सुरूवात झाली असून नव्या जोमाने सर्वच नगर परिषदा कामाला लागल्या आहेत.
या स्पर्धेतूनच आपल्या शहराचा क्रमांक ठरविला जाणार असून त्यातूनच शहरवासीयांची स्वच्छतेबाबत तत्परता दिसून येणार आहे. यामुळे शहरवासीयांना स्वच्छतेची जाण झाल्यावरच आपले शहरही स्पर्धेत वरचा क्रमांक गाठणार आहे. शहरवासीयांच्या सहकार्या शिवाय हे शक्य नसून यासाठी शहरवासीयांत स्वच्छतेबाबत जागृती करणे गरजेचे आहे.
यातूनच नगर परिषदेने आता स्वच्छता जनजागृती उपक्रम हाती घेतला असून यांतर्गत गुरूवारी (दि.२५) सिव्हील लाईन्स परिसरातील साई मंदिर, शुक्रवारी (दि.२६) सुभाष बगिचा व शनिवारी (दि.२७) सिव्हील लाईन्स हनुमान चौकात जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमातून नगर परिषदेतील स्वच्छता विभागासह अन्य कर्मचाऱ्यांनी परिसरातील लोकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत ओला-सुका कचरा वर्गीकरण, कचरा इतरत्र न फेकणे, घंटागाडीतच कचरा टाकणे व आपला परिसर स्वच्छ राखण्याचे आवाहन केले. सोबतच नगर परिषदेच्या स्वच्छता अॅपबाबत लोकांना माहिती देत कित्येकांना हे अॅप डाऊनलोड करवून दिले.
या उपक्रमात नगर परिषद मुख्याधिकारी चंदन पाटील, दिल्लीचे प्रतिनिधी राहूल शर्मा, स्वच्छता विभागाचे अभियंता सचिन मेश्राम, वीज विभागाचे अभियंता राहूल मारवाडे, आरोग्य निरीक्षक गणेश हतकय्या, प्रफुल पानतवने, मुकेश शेंदे्रे, मनिष बैरीसाल, देवेंद्र वाघाये, शिव हुकरे, सुमीत शेंद्रे, मंगेश कदम, प्रवीण गडे, पाणी पुरवठा विभागाचे उमेश शेंडे, कर विभागाचे श्याम शेंडे, प्रदीप घोडेस्वार, मुकेश शर्मा यांच्यासह अन्य कर्मचारी उपस्थित होते.
२४ तासांच्या आत तक्रार निवारण्याचा प्रयत्न
नगर परिषदेच्या स्वच्छता अॅपवर शहरवासीयांना त्यांच्या परिसरातील घाणी व कचऱ्याचे छायाचित्र काढून तक्रार नोंदविता येणार आहे. शहरवासीयांकडून टाकण्यात आलेल्या या तक्रारींचे २४ तासांच्या आत निवारण करण्याचा प्रयत्न नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाकडून केला जाणार आहे. यासाठी स्वच्छता अॅपबाबत या कार्यक्रमातून शहरवासीयांना समजाविण्यात आले. शिवाय कित्येकांना हे अॅप डाऊनलोड करवून देण्यात आले आहे.