पोलीस कल्याण निधी वांझोटाच

By Admin | Published: February 23, 2016 02:16 AM2016-02-23T02:16:04+5:302016-02-23T02:16:04+5:30

मागील चार वर्षापासून पोलिसांच्या कल्याणासाठी निधी संकलित करण्यात आला नाही. चार वर्षापूर्वी कोट्यवधीच्या

Police Welfare Fund | पोलीस कल्याण निधी वांझोटाच

पोलीस कल्याण निधी वांझोटाच

googlenewsNext

गोंदिया : मागील चार वर्षापासून पोलिसांच्या कल्याणासाठी निधी संकलित करण्यात आला नाही. चार वर्षापूर्वी कोट्यवधीच्या घरात असलेला पोलीस कल्याण निधी आताच्या स्थितीत फक्त १८ लाख शिल्लक आहे. त्यात भर घालून पोलीस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी विविध योजना राबविण्याची दृष्टीच सध्याच्या पोलीस प्रशासनात नसल्यामुळे हा निधी वांझोटा ठरत आहे.
चार वर्षापूर्वी जिल्ह्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक सुवेज हक यांनी पोलिसांच्या कल्याणासाठी लागोपाठ दोन वर्ष मोठे कार्यक्रम घेऊन मोठा निधी जमविला होता. त्यात एका वर्षी प्रसिद्ध आॅर्केस्ट्रा घेतला तर दुसऱ्या वर्षी शिर्डीचे साईबाबा या नाट्यप्रयोगाचे आयोजन केले होते. एका नाट्यप्रयोगातूनच ४ कोटीच्या वर पोलीस कल्याण निधी गोळा केला होता. खर्च वजा जाता ३ कोटींपेक्षा जास्त निधी जमा होता. त्यातून पोलिसांसाठी कमी किमतीत साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी दुकान सुरू करण्यात आले. पोलिसांसाठी वाचनालय, जीम, सोसायटी सुरू केली. मात्र गेल्या तीन वर्षापासून पोलीस कल्याण निधीसाठी पोलीस अक्षीक्षकांकडून कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन न केल्यामुळे तीन कोटीच्या वर असलेला निधी फक्त १८ लाखांवर आला आहे.
या कल्याण निधीतून पोलीस कर्मचाऱ्यांच्या गुणवंत मुलांचा सत्कार करणे, उन्हाळी शिबिर आयोजित करणे, सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करणे, जीमचे साहित्य, वाचनालयावर खर्च व पोलिसांच्या कल्याणासाठी इतर कार्यक्रमांचे आयोजन या निधीतूनच केले जाते. कल्याण निधीत कार्यक्रमाच्या माध्यमातून पैशाची भर पडल्यास इतरही अनेक उपक्रम राबविले जाऊ शकतात. परंतू त्याबाबत विद्यमान पोलीस प्रशासन उदासीन असल्याचे दिसून येते.
शिल्लक असलेला निधी फक्त खर्च केला जात असल्याने शिल्लक असलेले १८ लाख रूपये खर्च होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलीस प्रशासनाने पोलिसांच्या कल्याणासाठी नवनवीन प्रकल्प राबवावेत आणि नक्षलग्रस्त जिल्ह्यात अधिक सोयीसुविधा निर्माण कराव्यात अशी अपेक्षा केली जाते.(तालुका प्रतिनिधी)

गोंदियावासीय करतात चांगल्या अधिकाऱ्यांवर प्रेम
४ गोंदिया पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना मदत म्हणून १२ हजार रूपये गोंदिया पोलीस विभागाकडून देण्यात येतात. कल्याण निधीत वाढ झाल्यास ही रक्कम वाढविणे शक्य होणार आहे.
४ पो.अधीक्षक हक यांच्या कार्यकाळात दोन मोठ्या कार्यक्रमांमुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला भुर्दंड बसला. तरीही हक यांची बदली झाली त्यावेळी बहुतांश राजकीय मंडळींसह सर्वसामान्य नागरिक त्यांची बदली रद्द करण्याची मागणी करताना दिसले. आता मात्र हे चित्र पहायला मिळत नाही.

मार्च महिन्यात होणार आॅर्केस्ट्रा
४गोंदिया पोलीस दलातील पोलिसांचा कल्याण निधी वाढावा यासाठी यंदा पोलीस अधीक्षकांनी मार्च महिन्यात आॅर्केस्ट्राचे कार्यक्रम आयोजित केले आहे. त्यासाठी जिल्हाभरातील ठाणेदार पोलीस कल्याण निधी संकलनासाठी फिरत आहेत. हक यांच्या कार्यकाळात गोळा केलेल्या निधीचा आकडा पार करणे यावेळी पोलिसांना शक्य आहे का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Police Welfare Fund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.