सासऱ्याच्या जाचाला कंटाळून गर्भवतीने विष प्राशन केले
By admin | Published: May 24, 2017 01:43 AM2017-05-24T01:43:51+5:302017-05-24T01:43:51+5:30
सासऱ्याकडून होणाऱ्या जाचाला कंटाळून एका गर्भवतीने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सासऱ्याकडून होणाऱ्या जाचाला कंटाळून एका गर्भवतीने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्या महिलेला उपचारासाठी गोंदियाच्या वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. शिल्पा अरुण दास (१९) रा. अरुणनगर असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचे नाव आहेत.
अर्जुनी-मोरगाव तालुक्याच्या अरुणनगर (कोरंभीटोला) येथील शिल्पा अरुण दास ही महिला पती व सासू सासऱ्यासोबत चंद्रपूर येथे कामानिमित्त गेले होते. दोन दिवसापूर्वी अरुणनगर येथे ते परतले. शिल्पा सासरा तिचा छळ करीत असल्याने पुन्हा चंद्रपूर जाणे शिल्पाला आवडत नव्हते.
अरुणनगर येथे माहेर व सासर दोन्ही असल्याने शिल्पा अरुणनगर येथे राहणे पसंत करीत होती. तिच्या पोटात २० आठवड्याचे बाळ असल्याने समोर प्रसूतीची वेळ येणार असल्याचे पाहून शिल्पाने चंद्रपूरला जाण्यास नकार दिला. परंतु सासऱ्याकडून नेहमीच तिला त्रास होत असल्याने ती कंटाळली. तिचे माहेर गावातच असल्याने आईकडे आलेल्या शिल्पाने पोटात असलेल्या गर्भाचाही विचार न करता शेतात फवारणी करण्यासाठी आणून ठेवलेले किटकनाशक मंगळवारच्या सकाळी १०.३० वाजता प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.
या प्रकाराची माहिती तिच्या आईला मिळताच तिच्या आईने चिंच व निंबूचे पाणी तिला पाजून उलट्या करण्यास बाध्य केले.
अर्जुनी-मोरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर गंगाबाई स्त्री रुग्णालयात त्यानंतर वैद्यकीय महाविद्यालयात तिला दाखल करण्यात आले. तिच्यावर उपचार सुरु आहेत.
पोटात जागा दिली, घरात देणार नाही का?
सासऱ्याकडून जर त्रास होत असेल तर जीव देण्याचा विचार का करतेस मी तुला माझ्या पोटात जागा दिली तर छळामुळे घरात जागा देणार नाही का? असा सवाल शिल्पाच्या आईने तिला करीत अशी चूक आयुष्यात करायची नाही, अशी समज दिली. घटनेची माहिती देताना शिल्पाच्या आईला अश्रृ अनावर झाले.