प्राथमिक शिक्षण विभाग वाऱ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2016 01:02 AM2016-06-18T01:02:57+5:302016-06-18T01:02:57+5:30
मागील दोन वर्षांपासून प्रशासन अधिकारी नसल्याने येथील नगर परिषदेचा प्राथमिक शिक्षण विभाग वाऱ्यावर आला आहे.
दोन वर्षांपासून प्रशासन अधिकारी नाही : पालिकेच्या प्राथमिक शाळा अडचणीत
गोंदिया : मागील दोन वर्षांपासून प्रशासन अधिकारी नसल्याने येथील नगर परिषदेचा प्राथमिक शिक्षण विभाग वाऱ्यावर आला आहे. परिणामी नगर परिषदेच्या प्राथमिक शाळांची स्थिती गंभीर असून विद्यार्थी पटसंख्या घसरत चालली आहे. असे असतानाही शासन तसेच पालिका प्रशासनाचे या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष दिसून येत आहे.
खासगी शाळांपुढे नगर परिषद व जिल्हा परिषदेच्या शाळा टिकत नसल्याचे दिसून येते. यात मात्र जिल्हा परिषदेकडून याची दखल घेत प्रयत्न सुरू झाल्याने जिल्हा परिषदेच्या शाळा कात टाकून आता खाजगी शाळांना टक्कर देऊ लागल्या आहेत. यात मात्र नगर परिषदेच्या शाळांसाठी स्थान राहिलेले नाही. कारण पालिकेच्या शाळांची अत्यंत दयनीय अवस्था आहे. मोजकेच विद्यार्थी असल्यामुळे शाळा बंद करण्याची पाळी नगर परिषदेवर आली आहे.
या मागचे कारण असे की, शासन तसेच नगर परिषद प्रशासन यांच्या हलगर्जीपणामुळे नगर परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील प्रशासन अधिकाऱ्यांचे पद रिक्त पडून आहे. डी.एस.मदारकर यांची ३१ आॅगस्ट २०१२ मध्ये सेवानिवृत्ती झाल्या नंतर पासूनच हे पद रिक्त पडून आहे. यावर १४ सप्टेंबर २०१२ पासून प्रशासन अधिकाऱ्यांचा प्रभार तिरोडाचे एस.एस. ठाकरे यांच्याकडे सोपविण्यात आला होता. मात्र त्यांच्याकडे तिरोडाचा कारभार व येथील प्रशासन अधिकाऱ्यांचा कारभार असल्याने त्यांची गोची होत होती. परिणामी ते आठवड्यातून काही दिवस येथे येत होते.
अशात एक ना थड भाराभर चिंध्या हीच गत प्राथमिक शिक्षण विभागाची झाली होती असे बोलणे वावगे ठरणार नाही. अशात ३१ मे २०१५ रोजी ठाकरे यांचीही नागपूरला बदली झाी. त्यामुळे विभागाकडे प्रशासन अधिकारीच नसल्याने विभागाचा कारभार रेटला जात आहे. यामुळे मात्र पालिकेच्या प्राथमिक शाळांची गत दयनीय झाली आहे. विभागाच्या कारभारावर जातीने लक्ष ठेवायला अधिकारीच नसल्याने पालिकेच्या प्राथमिक शाळांचा दर्जा खालावत चालला आहे. परिणामी पालिकेच्या प्राथमिक शाळांमध्ये बोटांवर मोजण्याइतके विद्यार्थी असल्याने शाला आॅक्सीजनवर आल्या आहेत. (शहर प्रतिनिधी)
शिक्षण उपसंचालकांना दिले पत्र
प्रशासन अधिकारी देण्यात यावा या मागणीचे पत्र शिक्षण विभागाकडून २७ मे रोजी शिक्षण उपसंचालकांना देण्यात आले. यापूर्वीही प्रशासन अधिकाऱ्यांची मागणी करण्यात आली. मात्र त्याचा काहीच फायदा मिळाला नाही. अशात प्राथमिक शाळांचा दर्जा वाढावा, विद्यार्थी पटसंख्या वाढावी यासाठी धडपडणारा कुणीच नाही.
बोटावर मोजण्याइतकेच विद्यार्थी
पालिकेच्या १७ प्राथमिक शाळा आहेत. मात्र या शाळांत मागील वर्षी बोटावर मोजण्याइतकेच विद्यार्थी होते. आता नवे शैक्षणिक सत्र सुरू झाले असून विद्यार्थी संख्या अद्याप स्पष्ट झालेली नाही. मात्र त्यात काही सुधारणा झाली असावी असा काहीसा प्रकार दिसून येत नसून आहे तीच स्थिती या शाळांची आहे. अशात पालिकेवर शाळांना बंद करण्याची पाळी येणार असे म्हणणे वावगे ठरणार नाही.