बचत गटांसाठी व्यापारी संकुल उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 11:41 PM2017-10-13T23:41:38+5:302017-10-13T23:42:06+5:30

महिला बचत गटांमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे. बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळाल्यास महिलांना रोजगार उपलब्ध करुन देण्यास मदत होईल.

Setting up a merchant package for the savings groups | बचत गटांसाठी व्यापारी संकुल उभारणार

बचत गटांसाठी व्यापारी संकुल उभारणार

Next
ठळक मुद्देमहिला सक्षमीकरणाचा प्रयत्न : महिला बालविकास सचिवांच्या बैठकीत निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : महिला बचत गटांमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे. बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळाल्यास महिलांना रोजगार उपलब्ध करुन देण्यास मदत होईल. त्यासाठी शहरातील जयस्तंभ चौकातील उपवनसंरक्षक कार्यालयाच्या जागेवर महिला बचत गटांसाठी भव्य व्यापारी संकुल व सामाजिक कार्यासाठी सभागृह तयार करण्यात येणार आहे. याला राज्य सरकारने मंजुरी दिली असून लवकर कामाला सुरूवात केली जाणार असल्याचे आ.गोपालदास अग्रवाल यांनी सांगितले.
आ. अग्रवाल यांनी संदर्भात संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांची बैठक घेतली. तसेच बचत गटासाठी व्यापार संकुल उभारण्यासंदर्भात आढावा घेतला. कुडवा नाका परिसरात ४ कोटी रुपये खर्चून वनभवन तयार करण्यात आले आहे. यामुळे वनविभागाची शहरातील विविध ठिकाणातील कार्यालये आता एकाच ठिकाणी वनभवनात स्थापन केली जाणार आहे. आ.अग्रवाल यांच्या पाठपुराव्यामुळे वनभवनाची भव्य इमारत उभरण्यात आली. त्यामुळे जयस्तंभ चौकात असलेल्या उपवनसंरक्षक कार्यालयाचे स्थानांतरण वनभवनात केले जाणार आहे. त्यामुळे या ठिकाणी महिला बचत गटांनी उत्पादीत केलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी व्यापार संकुल उभारण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे आणि महिला बालविकास सचिव हे देखील बैठकीला उपस्थित होते. आ. अग्रवाल यांनी बचत गटांच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण शक्य आहे. यामुळे ग्रामीण भागातील महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे सांगितले.
या व्यापारी संकुलाचे काम जलदगतीने कसे पूर्ण करता येईल दृष्टीने प्रयत्न करण्याचे निर्देश अग्रवाल यांनी दिले. या वेळी त्यांनी जिल्हा ग्रंथालय शहराबाहेर असल्याने नागरिकांना तिथे जाणे शक्य होत नाही. त्यामुळे हे ग्रंथालय सुद्धद शहराच्या मध्यभागी आणण्याची गरज असल्याचे सांगितले. जयस्तंभ चौक येथे व्यापार संकुलासह सभागृह देखील उभारण्यात येणार आहे. यामुळे पंचायत समितस्तरीय कार्यशाळा, महिला बचत गटांचे मेळावे, विविध सामाजिक कार्यक्रम घेण्यास सोयी होईल. महिला बालविकास विभागाच्या सचिव विनिता वेदसिंगल यांनी आ.अग्रवाल यांच्या प्रस्तावाचे स्वागत केले.
यामुळे महिलांना आर्थिकदृष्टया सक्षम करण्यास मदत होणार असल्याचे सांगितले. जिल्हाधिकारी काळे यांनी यासाठी प्रशासनातर्फे हे काम जलदगतीने पूर्ण केले जाईल असे आश्वासन दिले.

बचतगटांसाठी कार्यशाळा
महिला बचतगटांना प्रोत्साहीत करण्यासाठी त्यांना हक्काची इमारत व व्यापार संकुल उपलब्ध होणार आहे. बचत गटातील महिलांना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी मुंबई येथून उत्पादन व व्यापार क्षेत्रातील विशेषज्ज्ञांची कार्यशाळा गोंदिया येथे आयोजित करण्याची मागणी आमदार अग्रवाल यांनी केली. यावर सचिव वेदसिंगल यांनी येत्या महिन्यात जिल्ह्यातील महिला बतच गटांसाठी कार्यशाळा आयोजीत करण्याचे निर्देश संबंधीतांना दिले. या कार्यशाळेत महिलांना रोजगारविषयक माहिती दिली जाणार आहे.

Web Title: Setting up a merchant package for the savings groups

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.