सूर्यनमस्कार सर्वांग सुंदर व्यायाम
By Admin | Published: February 3, 2017 01:35 AM2017-02-03T01:35:10+5:302017-02-03T01:35:10+5:30
भारतीय व्यायाम प्रकारात शारीरिक व्यायाम अनेक आहेत. या सर्व व्यायाम प्रकारात सूर्यनमस्कार हाच सर्वांगसुंदर व्यायाम प्रकार आहे,
विनायक अंजनकर : विद्यार्थ्यांना योग प्राणायामाचे धडे
गोरेगाव : भारतीय व्यायाम प्रकारात शारीरिक व्यायाम अनेक आहेत. या सर्व व्यायाम प्रकारात सूर्यनमस्कार हाच सर्वांगसुंदर व्यायाम प्रकार आहे, असे मत व सूर्यनमस्काराचे विद्यार्थ्यांना धडे गिरवताना आदर्श शिक्षक विनायक अंजनकर यांनी व्यक्त केले.
रविंद्र विद्यालय चोपा येथे विद्यार्थ्यांना सूर्यनमस्काराचे प्रात्यक्षिक करून दाखविताना ते मार्गदर्शन करीत होते.
सदर विद्यालयात दर शनिवारी विविध व्यायाम प्रकार, ध्यान-धारणा याबाबत तासिका घेवून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते. यात तज्ज्ञ शारीरिक शिक्षक व साधकांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना व्यायाम, साधना प्रकारचे ज्ञान दिले जाते. शनिवारी विनायक अंजनकर यांनी सूर्यनमस्कार व्यायाम प्रकाराची सखोल माहिती देवून १२ ऐवजी १० स्टेप अत्यंत महत्वपूर्ण असून विद्यार्थ्यांना कमी वेळात, कमी जागेत, विना खर्चाने करता येते. शारीरिक, मानसिक, बौद्धीक सुदृढता शंभर टक्के मिळते. सूर्यनमस्काराच्या १० स्टेप कशा कराव्या, त्याचे बारकावे व त्यापासून संपूर्ण शरीराला मिळणारे फायदे प्रत्यक्ष कृती करुन व करवून सांगितले.
सूर्यनमस्कार व्यायाम प्रकारात प्राणायाम, योगासन, साधना समाविष्ट असल्यामुळे दररोज सकाळ, संध्याकाळ सूर्यनमस्कार सर्वांनी १५ ते २० मिनिटे केल्यास आपल्या शरीरात नक्कीच नवचेतना संचारल्याशिवाय राहणार नाही. आज वाढते प्रदुर्षण, भेसळयुक्त खाद्य, स्पर्धात्मक धावपळ बघता स्वत:च्या शारीरिक सुदृढतेसाठी फक्त सूर्यनमस्कार घरी घातले तरी देशाचा युवा सुदृढ व सर्वांगसुंदर होऊ शकतो. यात तिळमात्र शंका नाही, असे ते म्हणाले. (शहर प्रतिनिधी)