दोन भावंडांच्या अपहरणाचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 12:02 AM2017-11-17T00:02:03+5:302017-11-17T00:02:35+5:30
दोन सख्ख्या भावांना पैशाचे आमिष देऊन त्यांचा तीन अज्ञात व्यक्तींनी अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याची घटना देवरीपासून काही अंतरावर असलेल्या धोबीसराड येथे १४ नोव्हेबरला घडली;.....
लोकमत न्यूज नेटवर्क
देवरी : दोन सख्ख्या भावांना पैशाचे आमिष देऊन त्यांचा तीन अज्ञात व्यक्तींनी अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याची घटना देवरीपासून काही अंतरावर असलेल्या धोबीसराड येथे १४ नोव्हेबरला घडली; मात्र याची माहिती देवरी पोलिसांना बुधवारी (दि.१६) देण्यात आली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आली. या घटनेमुळे देवरी तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
अंकुश बबन बागडे (१३) आणि चंद्रशेखर बबन बागडे (९) रा. धोबीसराड असे अपहरण करण्याचा प्रयत्न झालेल्या दोन्ही सख्ख्या भावांची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार, मंगळवारी (दि.१४) दुपारी २ वाजताच्या सुमारास हे दोघेही भाऊ घरच्या शेळ्या चारायला गावालगत असलेल्या राष्टÑीय महामार्ग क्र.६ च्या बाजूला गेले होते.
दरम्यान रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तीन व्यक्तींपैकी एका व्यक्तिने दोन्ही भावांच्या जवळ येत त्यांना १०-१० रुपये खाऊ खाण्यास दिले. तसेच पुन्हा प्रत्येकी शंभर रुपये देण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर त्यांना तुमच्या गावात किती लहान मुले आहेत. येथे घनदाट झुडूप कुठे आहे, अशी विचारपूस त्यांना केली. तसेच त्यांच्या खांद्यावर हात ठेवत तुझ्या दोन्ही किडनी बरोबर आहेत की नाही, अशी विचारणा केली. त्यामुळे अंकुशला मुलांना चोरुन नेणारे तर हे व्यक्ती नाही ना, अशी शंका आली.
त्यांनी आम्ही इकडे शेळी चारायला आलो आहोत. जर शेळ्या इकडे-तिकडे गेल्या तर आमचे वडील रागावतील. त्यामुळे आम्ही घरी शेळ्या सोडून येतो, असे त्या अज्ञात व्यक्तींना सांगून दोन्ही भाऊ घरी परत आले. त्यानंतर दोन्ही भावांनी घडलेला हा सर्व प्रकार वडिलांना सांगितला. वडील बबन बागडे यांनी त्यांच्या शेजारी राहणारे राजू पटले व सदन खोटे यांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर राजू पटले यांनी घटना स्थळाकडे धाव घेतली. तिथे जावून त्यांनी आरडाओरड केली. तेव्हा तिथे लपून बसलेल्या दोन व्यक्तिंनी पळ काढला. तर त्यांच्यापैकी एकजणाने शौचास बसल्याचा देखावा केला. त्याच्याजवळ जाऊन राजू पटले यांनी तू येथे काय करीत आहेस, अशी विचारणा केली.
तेव्हा त्या व्यक्तीने पटले यांना खाली पाडून खिशातील चाकू काढून मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पटले चांगलेच घाबरले. त्यांनी घाबरेल्या अवस्थेतच सदर व्यक्तीच्या तोंडावर बुक्की मारुन तिथून पळ काढला. त्यानंतर गावात पोहचून घडलेला सर्व प्रकार गावकºयांना सांगितला.
गावकºयांनी लगेच घटनास्थळाकडे धाव घातली. तेव्हा तिथे कुणीच आढळला नाही. यानंतर या घटनेची माहिती पोलीस पाटील व देवरी पोलिसांना दिली. पोलिसांनी या घटनेबाबद चौकशी चौकशी सुरू केल्याची माहिती आहे. दरम्यान या घटनेमुळे देवरी तालुक्यात मुलांना पळवून नेणारी टोळी तरी सक्रिय नाही ना? अशी शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
दोन भावडांच्या अपहरणाप्रकरणाची तोंडी माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली. त्या आधारावर आम्ही तपास केला असून अद्यापही काही सुगावा लागलेला नाही.
- राजेश तटकरे,
पोलीस निरीक्षक देवरी.