शून्य माता व बालमृत्यू अभियान
By admin | Published: March 7, 2017 12:57 AM2017-03-07T00:57:21+5:302017-03-07T00:57:21+5:30
महाराष्ट्राच्या अगदी शेवटच्या टोकावर वसलेला गोंदिया जिल्हा २६ जानेवारीपासून नाविण्यपूर्ण ‘शून्य माता व बालमृत्यू अभियान’ ...
तंत्रज्ञानाची जोड : जिल्ह्याधिकाऱ्यांची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्याचा प्रयत्न
गोंदिया : महाराष्ट्राच्या अगदी शेवटच्या टोकावर वसलेला गोंदिया जिल्हा २६ जानेवारीपासून नाविण्यपूर्ण ‘शून्य माता व बालमृत्यू अभियान’ जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे व जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु करण्यात आले. गोंदिया जिल्हा संपूर्णत: आदिवासी आणि नक्षलग्रस्त आहे. संपूर्ण जंगलव्याप्त दुर्गम भागात आरोग्यविषयी साक्षरता पोहचवून ‘शून्य माता व बाल मृत्यू’ ही संकल्पना रूजविणे खूपच जिकरीचे लक्ष वाटले. परंतु जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांच्या प्रेरणेतून ‘शून्य माता व बाल मृत्यू’ हे अभियान चांगलेच सकारात्मक वेग घेवू लागले आहे.
जिल्ह्यात जून २०१७ पासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कार्यान्वयीन झाले. जिल्हा मुख्यालयी बाई गंगाबाई महिला व बाल रूग्णालय हे २०० बेडयुक्त सुसज्ज प्रसूती रु ग्णालय आहे. याच रु ग्णालयात सुसज्ज ५० बेडयुक्त नवजात शिशुसाठी अतिदक्षता कक्ष सुरु करण्यात आले. त्यामुळे ‘कोवळी पानगळ’ रोखण्यासाठी मदत झाली. तसेच १२ ग्रामीण रु ग्णालयातून प्रथम सेवा संदर्भ केंद्र पुनर्जीवित करण्यासाठी जिल्हाधिकारी काळे यांनी पुढाकार घेतला. तालुका स्तरावर ग्रामीण रु ग्णालयात प्रशिक्षीत प्रसूती तज्ज्ञ व बालरोग तज्ज्ञ यांच्या सेवा २४ बाय ७ उपलब्ध ठेवण्यासाठी समन्वय कक्षाची स्थापना केली. सुरक्षीत प्रसूती झालीच तरच १०० टक्के ‘शून्य माता मृत्यू’ अभियान यशस्वी होईल, हा या अभियानाचा मूलमंत्र जिल्हाधिकारी काळे यांनी दिला.
जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पुलकुंडवार यांनी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात २४ बाय ७ वैद्यकीय अधिकारी मुख्यालयी उपलब्ध राहून गर्भवती महिला व नवजात शिशुंना अत्यावश्यक सेवा देतील, याची हमी घेवून प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु केली. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात सुसज्ज प्रसूती कक्ष, नवजात शिशू कॉर्नर, अत्यावश्यक औषधी व २४ बाय ७ उपलब्ध रूग्णवाहिका यांची सोय करु न अभियानाला गती दिली आहे.
जिल्ह्यात सध्या मानव विकास मिशन अंतर्गत प्रत्येक आठवड्याला हाय रिस्क गर्भवतींचा स्पेशल कॅम्प प्रसूती तज्ज्ञांना प्राथमिक आरोग्य केंद्रावर बोलावून आयोजित करण्यात येतो. प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या २० ते २५ गावातील गर्भवती महिलांना खास रु ग्णवाहिका पाठवून मोफत प्राथमिक आरोग्य केंद्र दवाखान्यात आणूण प्रसूती तज्ज्ञामार्फत वैद्यकीय तपासणी, सल्ला, उपचार व कुटुंबीयांचे समुपदेशन करण्यात येते. बाई गंगाबाई महिला रु ग्णालय या एकमेव जिल्हा महिला रूग्णालयातील प्रसूती तज्ज्ञ डॉ. मोहबे, डॉ. योगेश केंद्रे, डॉ. सुवर्णा हुबेकर यांच्या समन्वयातून मानव विकास शिबिरातून गर्भवतींची नियमित तपासणी झाल्यामुळे सुरक्षीत मातृत्वाची हमी मिळाली.
‘शून्य माता व बाल मृत्यू’ हे ध्येय साध्य करण्यासाठी गर्भवती महिलांना डॉ. हुबेकर यांनी समुपदेशन केले. गर्भवती महिलांना सुरक्षीत मातृत्व हवे असेल तर त्यांनी आरोग्याची सप्तपदी पाळलीच पाहिजे. गर्भवती महिलांनी गर्भधारणेचे निदान झाल्याबरोबर पहिल्या तीन आठवड्यांच्या आत नोंदणी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पुलकुंडवार यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रत्येक आरोग्य सेविकाला वैयक्तीक आवाहन केले की, आपल्या कार्यक्षेत्रातील गर्भवतींची १०० टक्के नोंदणी झालीच पाहिजे.
गोंदिया सारख्या दुर्गम व आदिवासी भागात आरोग्य व पोषाहाराबाबत साक्षरता कमी असल्याने बहुतांश गर्भवतीमध्ये रक्तक्षयाचे प्रमाण आढळून येत होते. त्यामुळे जिल्हाधिकारी काळे यांच्या संकल्पनेतून गर्भवतीच्या पुरूष कुटुंबीयांना दवाखान्यात पाचारण करु न एक गटचर्चा बैठक आयोजित करण्याचे धोरण आखण्यात आले. प्रत्येक वैद्यकीय अधिकाऱ्याने आपल्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक गावात प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या शुक्र वारी गर्भवतीच्या नवऱ्याची, सासरे व कुटुंबीयाची गटचर्चा सभा आयोजित केली. २६ जानेवारी २०१७ रोजी अशाप्रकारची पुरु ष मंडळीची पहिली सभा जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील चिचगाव येथील आरोग्य उपकेंद्रात झाली.
यावेळी जि.प.अध्यक्ष उषा मेंढे, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, जि.प.आरोग्य व शिक्षण समिती सभापती पी.जी. कटरे प्रामुख्याने उपिस्थित होते. सडक-अर्जुनी तालुक्यातील चिखली या गावीसुध्दा पालकमंत्री राजकुमार बडोले व जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी उपस्थित राहून या ‘शून्य माता व बाल मृत्यू’ अभियानात लोकसहभाग वाढविला.
जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पुलकुंडवार यांनी ‘शुध्द बीजापोटी फळे रसाळ गोमटी’ या उक्तीप्रमाणे सुदृढ व निरोगी बाळ हवे असेल तर गर्भवतीच्या आहाराकडे व पोषणाकडे लक्ष दिले पाहिजे म्हणून या ‘शून्य माता मृत्यू’ अभियानात महिला व बाल प्रकल्प अधिकाऱ्यांना देखील शामील करु न घेवून जिल्ह्यातील अंगणवाडींना डॉ.पुलकुंडवार यांनी स्वत: भेट देवून स्व. एपीजे अब्दूल कलाम अमृत आहार योजनेची थेट आदिवासी पाड्यावर कशी अंमलबजावणी होते याची क्षेत्रीय भेटी देवून वेळोवेळी पाहणी करु न संबंधितांना योग्य दिशा निर्देश दिले. त्यामुळे गर्भवतींच्या वजनामध्ये सकारात्मक फरक पडत आहे.
‘शून्य माता व बाल मृत्यू’ अभियानाला तंत्रज्ञानाची जोड दिली आहे. व्हॉट्सअॅप सारख्या सोशल मीडियाचा वापर करु न ‘शून्य माता व बाल मृत्यू’ हा ग्रुप स्थापन करून त्यात सर्व जिल्हा स्तरावरील प्रसूती तज्ज्ञ, तालुका आरोग्य अधिकारी व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी सक्रि य करण्यात आले. जिल्हाधिकारी काळे व जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पुलकुंडवार सदर ग्रुपच्या माध्यमातून सतत संपर्क ठेवून मार्गदर्शन करु न ‘प्रत्येक जीव महत्वाचा’ हे ध्येय प्रेरीत करीत आहेत. त्यामुळे सुरु वातीच्या एक महिन्याच्या काळातच ‘माता मृत्यू शून्य’ करण्यासाठी यश आले आहे. ही वाटचाल अशीच सुरु राहील. (प्रतिनिधी)
घरच्या पुरूषांचा मोहिमेत सहभाग
गर्भवतीच्या घरच्या पुरूष मंडळींना आपल्या घरात येणाऱ्या नव्या पाहुण्यांबद्दल जशी उत्सुकता असते तसेच गर्भवतीच्या आरोग्याची चिंतादेखील असते. त्यामुळे त्यांना या मोहिमेत सहभागी करून घेवून त्यांना गर्भवतीच्या रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण, गर्भवतीचे वजन, गर्भवतीचा रक्तदाब किंवा इतर वैद्यकीय आजार याबाबत सविस्तर माहिती डॉक्टरांनी दिली. तसेच गर्भवतीला काही अचानक त्रास झाला किंवा धोक्याचे लक्षणे कशी ओळखावी, रु ग्णालयात भरती केव्हा करावे आदी सविस्तर समुपदेशन डॉक्टरांनी केले. याला पुरु ष मंडळीकडून खुपच सकारात्मक प्रतिसाद मिळाला.
सुरक्षित मातृत्वाची सप्तपदी
जिल्हाधिकारी काळे यांनी प्रत्येक तालुक्याच्या तालुका आरोग्य अधिकारी यांना नोडल अधिकारी संबोधून त्यांच्यावर प्रत्येक गर्भवतीची राज्य शासनाच्या आरोग्य सेवेच्या ‘ई ममता’ या सॉफ्टवेअरवर गर्भवतीच्या आयडीसह नोंदणी अपडेट करण्याच्या सूचना देवून वेळोवेळी आकस्मिक अवलोकन केले. गर्भवतीच्या आरोग्य तपासणीच्या वेळी सुरक्षीत मातृत्वाच्या सप्तपदीबद्दल जसे- १०० टक्के नोंदणी, गर्भवतीचे लसीकरण, अत्यावश्यक रक्त तपासण्या, गर्भवतीची वैद्यकीय तपासणी व प्रतिबंधक लोह व कॅल्शीयम गोळ्यांचा उपचार, संतुलीत आहार व दुपारची विश्रांती, नियमित वैद्यकीय तपासणी, धोक्याच्या लक्षणांची ओळख, तात्काळ वैद्यकीय उपचार व आरोग्य संस्थेतच बाळंतपण ही सप्तपदी गर्भवतीला समजावून सांगण्यात आली.
बालकांच्या जीविताची हमी
गर्भवती महिलेचे हिमोग्लोबीनचे प्रमाण व रक्तदाबाची माहिती दर महिन्याला एक पत्रकाद्वारे संबंधित महिलेच्या कुटुंबाला देण्यात येते. जिल्हाधिकारी काळे यांनी गर्भवतीच्या कुटुंबीयांसमोर एकच लक्ष ठेवले की, सुदृढ बाळ जन्माला आले पाहिजे. तीन किलो वजनाचे बाळ म्हणजे बाल जीविताची हमी, हा विचार जिल्हाधिकाऱ्यांनी गर्भवतीच्या पुरूष मंडळी नातेवाईकांवर ठसविला. गर्भवतींची नियमीत वैद्यकीय तपासणी, हिमोग्लोबीन, बीपी चेकअप व संतुलित पोषाहार याची १०० टक्के अंमलबजावणी होईल, याची जबाबदारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. निमगडे यांनी घेतली.