डॉक्टर्स डे : आपण कसं बोलतो डॉक्टरांशी, कधी विचार केलाय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2017 05:39 PM2017-07-01T17:39:38+5:302017-07-01T17:39:38+5:30
डॉक्टर म्हणजे देव इथपासून सुरु झालेला प्रवास आता डॉक्टरांचीच सत्वपरीक्षा का घेतोय? आपण आपल्या डॉक्टरांवर ठेवतो का विश्वास?
- अनन्या भारद्वाज
आज डॉक्टर्स डे. आज दिवसभर डॉक्टरांना शुभेच्छा देणारे आणि त्यांचं कौतूक करणारे, विनादी चिमटे काढणारे मेसेज सोशल मीडीयात फिरतील, पण कधी विचार केलाय का, आपलं आणि डॉक्टरांचं नातं नक्की कसं आहे? एकेकाळी फॅमिली डॉक्टर ही फार मोठी, विश्वासाची, मन मोकळं करण्याची, अत्यंत भरवशाची जागा होती. आता फॅमिली डॉक्टर ही कल्पनाच फारशी उरलेली नाही. पूर्वी फॅमिली डॉक्टरला कुटूंबाची सगळी हिस्ट्री माहिती असायची, एक कौटुंबिक नातं असायचं. त्याच्यावर भरवसा ठेवून लोक निर्णय घेत. आता सर्दी खोकल्यासाठी सुद्धा लोक स्पेशालिस्टकडे जावू लागलेत. साधेसुधे आजार लोकांना होतच नाही जणू, डायरेक्ट स्पेशालिस्टकडेच गर्दी. मात्र हे सारं होत असतानाही डॉक्टरशी आपण म्हणजे पेशण्ट कसे बोलतो? काय प्रश्न विचारतो? डॉक्टरांवर पूर्ण विश्वास ठेवतो का? हे सारे प्रश्न आहेतच. मेडिकल व्यवसायातील अपप्रवृत्तींविषयी ही चर्चा नाही तर रुग्ण आणि रुग्णांचे नातेवाईक म्हणून आपण डॉक्टरांशी कसं बोलतो, काय प्रश्न विचारतो याची एक जरा आत्मपरिक्षणात्मक झलक आहे. जरा आपणही आपल्यातल्या नकारात्मक संवादावर उपाय शोधू. आजच्या डॉक्टरर्स डे निमित्त.
१) आपण जातानाच सारं गुगल करुन ठेवतो. आपल्या आजाराविषयी सारी माहिती गुगलवरुन जमवतो. जी जी लक्षणं दिसतात ती ताडून पाहतो. अनेकदा ती लक्षणं आपल्याला गंभीर आजार असल्याचं सांगतात, त्या भितीनं आपण अधिक अस्वस्थ होतो. आणि मग डॉक्टरांनी आपलं निदान करण्यापूर्वी आपण डॉक्टरांना विचारतो, गुगलवर तर असं लिहिलंय. गुगल तर तसं सांगतंय. मला हे झालं असेल का? मला तेच नसेल कशावरुन? तुम्ही कशावरुन हे निदान करताय? आपलं हे स्व गुगल निदान आणि ज्ञान डॉक्टरांसमोर मांडताना आपण डॉक्टर काय म्हणतात हे ऐकून, समजून तरी घेतो का?
२) पहिल्या भेटीनंतर डॉक्टर काही औषधं देतात. आपण ती घेतो. थोडं बरं वाटतं. पुन्हा जातो. डॉक्टर विचारतात, आता कसं वाटतंय? बरं वाटतं ते आपण सांगतच नाही, आपण म्हणतो, नाही हो अजून बरं वाटत नाही, काहीच सुधारणा नाही. काहीच खास बरं वाटत नाही.
जे बरं वाटतं, त्यासाठीची कृतज्ञता आपल्या शब्दात असते कुठं?
३) डॉक्टर या औषधांचे अपाय काय? साइड इफेक्ट काय? असं आपण सहज विचारतो, पण उपाय काय? यानं गुण आला तर तो काय असेल असं कधी विचारतो का?
४) बरंच वाटत नाही अजून, काही आणखी टेस्ट करायच्या का? असं आपणच डॉक्टरांना विचारतो. हा नाही तो डॉक्टर करत फिरतो, मेडिकल शॉपिंगच करतात अनेकजण. त्याची गरज असते का?
५) पुन्हा कधी येवू? असं न विचारता? बरं वाटेल ना, नाही वाटलं तर येवू का असंच विचारतो. म्हणजे या औषधांनी बरं वाटणार नाहीच असं समजूनच आपण तिथून निघतो.