टेन्शन असेल, तर कॉफीचा कप आधी बाजूला ठेवा..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 04:30 PM2018-01-04T16:30:20+5:302018-01-04T16:31:08+5:30
त्यानं तुमच्या डोक्याचा ताप आणखी वाढेल!
- मयूर पठाडे
सकाळी उठल्यवर आपल्याला चहा किंवा कॉफी नाही मिळाली तर कसं होतं? फक्त सकाळीच नाही, आपल्या वेळा जर ठरलेल्या असतील आणि त्यावेळी जर तुम्हाला ही पेयं मिळाली नाहीत, तर अंगाचा तिळपापड होतो. उगाचंच मूड जातो. चिडचिड व्हायला लागते. कामात लक्ष लागत नाही. सगळं गाडंच एकदम बिनसतं.
अनेकांना वाटतं, आणि तसं ते म्हणतातही, फक्त एक कप चहा किंवा कॉफी मला द्या, मग बघा, माझा कसा मूड लागतो ते! सगळं काम कसं फटाफट करुन फेकतो की नाही ते!
जोपर्यंत तो कप मिळत नाही, तोपर्यंत मग सारखं अस्वस्थ वाटत राहतं.
पण संशोधकांचं याबाबत नेमकं उलट म्हणणं आहे. ज्यावेळी तुम्ही चिंतेत, काळजीत असता, कुठल्या तरी गोष्टीनं तुमची मनस्थिती बिघडलेली असते, त्यावेळी कॉफीसारख्या पेयांतील कॅफिन या घटकामुळे तुमचं टेन्शन आणखी वाढतं. त्यामुळे तुम्ही जर कुठल्या काळजीत असाल, त्या काळात कॉफीचं सेवन कमी करा. ते शक्य तितकं कमी किंवा शुन्यावर आणलं तर आणखीच चांगलं.
ज्यावेळी तुमच्या शरीरात कॅफिन जातं, त्यावेळी तुमच्या शरीरातील संप्रेरकांमध्येही वाढ होते. तुम्ही आधीच टेन्शनमध्ये असाल, तर ही संप्रेरकं तुमचं टेन्शन वाढवण्यात मदतच करतात. त्यामुळे टेन्शन असेल, तर कॉफीचा कप आधी बाजूला ठेवा..