व्यसनाधीन मुलाची हत्या करून पित्याने व भावाने रचला आत्महत्येचा बनाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 12:05 PM2017-09-15T12:05:31+5:302017-09-15T12:05:50+5:30
दांडेगाव शिवारातील विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याच्या घटनेला कलाटणी मिळाली असून हा खून असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिस तपासानंतर मयत बंडू नारायण डाढाळे याची हत्या त्याच्या वडिलांनी व भावांनी मिळून केल्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी बाळापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आखाडा बाळापूर ( हिंगोली), दि. 15 : दांडेगाव शिवारातील विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याच्या घटनेला कलाटणी मिळाली असून हा खून असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिस तपासानंतर मयत बंडू नारायण डाढाळे याची हत्या त्याच्या वडिलांनी व भावांनी मिळून केल्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी बाळापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी सविस्तर वृत्त असे की ,कळमनुरी तालुक्यातील दांडेगाव शिवारातील आखाड्यावर बंडू डाढाळे (वय-२२) रा.पार्डी ता.वसमत याचा मृत्यू झाला. या प्रकरणी कुरूंदा पोलीस ठाण्यात बंडू यांनी आजारपणास कंटाळून आत्महत्या केल्याच्या माहितीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. परंतु, घटनास्थळ बाळापूर पोलीस ठाण्याचे हद्दीत असल्याने ते तपासासाठी बाळापुर ठाण्याकडे वर्ग झाले.
बीट जमादार तुळशीराम गुहाडे यांनी याची चौकशी केली असता प्रकरण संशयास्पद वाटले. बंडूच्या घरच्यांनी त्याने विषारी द्रव्य प्राषण केल्याचे सांगितले असले तरी शवविच्छेदनात विषारी द्रव्याचा अंश नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तसेच मयताच्या डोक्यात मार असल्याचे व हात फ्रॅक्चर असल्याचेही यात उघड झाले. यानंतर बाळापुर पोलिसांनी चौकशीचे चक्र फिरविले असता बंडूच्या पित्याने व भावाने याप्रकरणी सत्यकथा सांगितली.
मयत बंडू हा व्यसनाधिन होता. यासोबतच तो दारू पिऊन सर्वांना त्रास देत असे. या प्रकाराला कंटाळून आम्ही त्यास विष पाजण्याचा प्रयत्न केला. यानंतर त्याच्या डोक्यात व हातावर लाकडाने मारहाण करून त्यास जिवे मारले. तो मृत झाल्याचे कळताच आम्ही त्याने विष पिऊन आत्महत्या केल्याचे सर्वाना सांगीतले. या माहितीवरून बाळापुर पोलिसांनी जमादार तुळशीराम गुहाडे यांच्या फिर्यादीवरून आरोपी पिता नारायण ग्यानबा डाढाळे (वय-५५) व भाऊ गोविंद नारायण डाढाळे (वय-२७) दोघेही रा.पार्डी खु.ता.वसमत यांच्याविरूध्द भादंविच्या कलम ३०२,२०१,३४ अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास ठाणेदार व्यंकट केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार सदानंद मेंडके करीत आहेत.