मध्य प्रदेशातील व्यापा-यास बीडच्या मुकादमाने ३ लाखाला गंडविले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2017 07:29 PM2017-12-16T19:29:38+5:302017-12-16T19:35:47+5:30
परभणी जिल्ह्यातील पाथरीच्या कारखान्यावर बैलगाड्या चालवायच्या असल्याचे सांगून मध्य प्रदेशातील एका व्यापा-यास गंडविणा-या बीड जिल्ह्यातील तिघांवर हिंगोली जिल्ह्यातील बासंबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
हिंगोली : परभणी जिल्ह्यातील पाथरीच्या कारखान्यावर बैलगाड्या चालवायच्या असल्याचे सांगून मध्य प्रदेशातील एका व्यापा-यास गंडविणा-या बीड जिल्ह्यातील तिघांवर हिंगोली जिल्ह्यातील बासंबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
बीड जिल्ह्यातील भास्कर श्रीरंग डोरले याने मी साखर कारखान्याचा मुकादम असून तेथे बैलांची फार गरज आहे, असे सांगून मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील देशगाव येथील भगवान लाला लुहार यांच्याशी १२ बैलांचा सौदा केला. त्यांची किंमत ३ लाख १४ हजार एवढी ठरली होती. तर त्या बदल्यात तीन धनादेश दिले. तसेच विश्वास नसल्यास माझ्यासोबत पाथरी येथील साखर कारखान्यावर चला, तेथे पैसे देतो, असे म्हणून भगवान यांना सोबत घेतली. अन्य एक इसम प्रभू, बोलेरो वाहन क्र.एम.एच.-१२- एच.यू-१७७७ चा चालक व इतर तिघांसह ते परभणीला गेले. तेथून भास्कर डोरलेने बैलाच्या गाड्या कारखान्यावर पाठवून दिल्या.
तसेच भगवान लुहार व सोबतच्यांना १ लाख ३५ हजार रुपये दिले. तर उर्वरित रक्कम हिंगोली येथे नातेवाईकांकडे घेवून देतो, असे सांगून इकडे आणले. चिंचोली फाट्याकडे नेवून तेथे इतर तिघांना मोटारसायकलने बोलावून लुहार व त्यांच्यासोबतच्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच चाकू व गुप्तीने मारहाण करून त्यांच्याकडील ७४ हजार रुपयांची रोकड, दोन मोबाईल हॅण्डसेट घेवून पोबारा केला. तर बैलांची उर्वरित १.९९ लाख एवढी रक्कमही दिली नाही.याबाबत लुहार यांनी बासंबा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.