दारुड्या मुलाच्या त्रासास कंटाळून कुटुंबाची पैनगंगा नदीत उडी; मायलेकीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 12:50 PM2018-11-22T12:50:03+5:302018-11-22T12:50:32+5:30
मराठवाडा-विदर्भ सिमेवर असलेल्या कनेरगाव नाका येथील पैनगंगा नदीवरील जुन्या पुलावरुन उडी घेत एका कुटुंबाने आत्महत्येचा प्रयत्न केला.
कनेरगाव नाका ( हिंगोली) : मराठवाडा-विदर्भ सिमेवर असलेल्या कनेरगाव नाका येथील पैनगंगा नदीवरील जुन्या पुलावरुन उडी घेत एका कुटुंबाने आत्महत्येचा प्रयत्न केला. आज सकाळी घडलेल्या या धक्कादायक घटनेत मायलेकीचा मृत्यू झाला असून वृद्ध बापाला वाचविण्यात यश आले आहे.
सविस्तर वृत्त असे की, विठ्ठल अमृतराव नायक (६०) त्यांची पत्नी शकुंतला विठ्ठल नायक (५५), मुलगी उमा देशमुख ( रा. पानकनेरगाव ता. सेनगाव ) यांनी दारुड्या मुलाच्या त्रासाला कंटाळून आज सकाळी पैनंगंगा नदीत आत्महत्या करण्याच्या उद्देशाने उडी मारली. यावेळी परिसरातील शेतकरी कैलास गावंडे, गजानन गावंडे, पंकज पोखरे यांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. यावेळी विठ्ठल नायक यांना बाहेर काढून त्यांचे प्राण वाचविण्यात यश आले तर शकुंतला व उमा यांचा बुडून मृत्यू झाला.
घटनेची माहिती कनेरगाव नाका चौकीत दिल्यानंतर कनेरगाव चौकीचे सुनिल खिल्लारे, मोहन धाबे, विजय महाले, राठोड घटनास्थळी दाखल झाले. घटना वाशिम जिल्ह्याच्या हद्दीत घडल्याने वाशिम पोलिसांना माहिती देण्यात आली आहे.