औंढा तालुक्यात भूकंपाचा सौम्य धक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 03:04 PM2017-08-16T15:04:28+5:302017-08-16T15:06:05+5:30
औंढा तालुक्यातील काही गावांसह वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथील गावास आज दुपारी १२ च्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला
औंढा /वसमत, दि. 16- औंढा तालुक्यातील काही गावांसह वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथील गावास आज दुपारी १२ च्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला असून रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता २.१ इतकी नोंद करण्यात आल्याची माहिती स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे भूकंप मापक विजय कुमार यांनी दिली आहे.
औंढा तालुक्यातील पिंपळदरी, पांगरा शिंदे, अमदरी, सोनवाडी, जामगव्हाण, जलालदाभा आदी भागात दुपारी १२.१० च्या सुमारास भूकंपाचा धक्का जाणवला. त्यानंतर परिसरातील गावांत एकच गोंधळ उडाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. दरम्यान, धक्का जरी सौम्य असला तरी या भागातील काही नागरिकांच्या घराच्या भींतीला तढे गेले असल्याची माहिती असून काही भागात शेतातील विहिरींचे दगड कोसळून पडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, दुपारच्या वेळी भूकंपाचा हादरा जाणवल्यामुळे सोनवाळी येथील जि.प. च्या भींतीला तढे गेले असून विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्यामुळे काही भागातील शाळा उघड्यावर सुरू ठेवण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे गत १५ दिवसापूर्वी या भागात १.१ रिश्टर स्केल भूकंपाची नोंद करण्यात आली होती. दरम्यान, वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे भागात मागील काही महिन्यापासून भूगर्भातून आवाज येत असल्याच्या घटना घडत असल्याने येथील नगारिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.