Hingoli Santosh Bangar : नेत्यांना यात्रेत बंदी, गावकऱ्यांनी गावाबाहेरच अडवला आमदार संतोष बांगर यांचा ताफा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2023 06:11 PM2023-01-08T18:11:26+5:302023-01-08T18:39:04+5:30
यात्रेत कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांना बोलवायचं नाही अशी परंपरा आहे. तरीदेखील आमदार बांगर आपल्या कार्यकर्त्यांसह पोहचले.
कळमनुरी (हिंगोली): राज्यात सत्तांतर झाल्यापासून अनेकदा ठाकरे गट आणि शिंदे गटाचे नेते आमने सामने आले आहेत. यातच नेहमीच चर्चेत असणारे हिंगोलीचे शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांच्यामुळे पुन्हा एकदा ठाकरे आणि शिंदे गटात वाद झाला. हिंगोली जिल्ह्यातील वारंगा मसाई येथे मसाई मातेची यात्रा सुरू आहे. यात्रेत कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांना बोलवायचं नाही अशी परंपरा आहे. मात्र असं असतानाही आमदार बांगर या यात्रेत गेल्याने गावकऱ्यांनी गावाबाहेरच त्यांचा ताफा अडवला. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच राडा पाहायला मिळाला.
नेहमी वादाच्या भोवऱ्यात असणारे आमदार बांगर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. हिंगोली जिल्ह्यातील वारंगा मसाई येथे दरवर्षी मसाई मातेची यात्रा भरते. या यात्रेत भाविकांची मोठ्याप्रमाणावर गर्दी असते. या यात्रेत कोणत्याही राजकीय पक्षातील नेत्यांना बोलावलं जात नाही. अनेक वर्षांची ही परंपरा पाहता जिल्ह्यातील राजकीय पुढारी देखील या यात्रेला जाण्यासाठी टाळतात. पण, आज शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह यात्रेत हजेरी लावली. पण, यावेळी गावकऱ्यांनी त्यांना गावात प्रवेश दिला नाही.
आ.संतोष बांगर यांना रोखन्याचा प्रयत्न.
— Lokmat (@lokmat) January 8, 2023
कळमनुरी तालुक्यातील वारंगा येथील मसाई माता यात्रेदरम्यान कोणत्याही राजकीय पुढार्यांना गावात न बोलावण्याची परंपरा आहे . pic.twitter.com/W28RekTjNB
शेकडो वर्षांपासून ही यात्रा या गावांमध्ये भरते. यात्रेनिमित्त या गावासह पंचक्रोशीतील हजारो भाविक येथे सहभागी होत असतात. यंदा ही यात्रा 7 जानेवारी रोजी भरली आहे. ग्रामस्थांनी आमदार बांगर यांना मंदिराच्या अलीकडेच रोखले आणि आज देवीच्या दर्शनासाठी येऊ नका, यात्रा झाल्यानंतर या असे सांगितले. यावेळी गावच्या यात्रेत राजकारण नको म्हणत शिंदे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. मात्र पोलीस प्रशासन व स्थानिक नागरिकांच्या मध्यस्थीने हा वाद मिटला आणि आमदार बांगर यांना दर्शनासाठी आतमध्ये सोडण्यात आलं.
वारंगा मसाई येथे कोणताही वाद झाला नाही, दोन पार्ट्यांमध्ये वाद होता. मी देवीचे दर्शन घेतले व माझा कार्यकर्त्यांनी जयघोष केला. कोणताही वाद येथे झाला नाही.- आ.संतोष बांगर