Lok Sabha Election 2019: ...अन् अपक्ष उमेदवारानं माघार घेताना शिवसेना उमेदवाराचं बिंग फोडलं!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 05:05 PM2019-03-29T17:05:54+5:302019-03-29T17:05:54+5:30
अॅड.शिवाजी जाधव यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केल्याने चुरस वाढली होती.
वसमत (जि.हिंगोली) : हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी अपक्ष म्हणून भरलेला अर्ज मागे घेत असलो तरी विधानसभेसाठी मीच उमेदवार राहील असा सुचक इशारा देत अॅड.शिवाजी जाधव यांनी आज अर्ज मागे घेतला. मात्र यावर स्पष्टीकरण देत असताना सुरुवातीला पाटील यांनीच अपक्ष अर्ज भरण्याचे सुचवले असल्याचा गौप्यस्फोट जाधव यांनी केल्याने खळबळ उडाली आहे.
हिंगोली लोकसभा मतदारसंघात युतीचे हेमंत पाटील आणि कॉंग्रेसकडून सुभाष वानखेडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यातच अॅड.शिवाजी जाधव यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केल्याने चुरस वाढली होती. त्यांच्या उमेदवारीवर चर्चा करण्यासाठी राज्यमंत्री अर्जून खोतकर, संपर्क प्रमुख आनंद जाधव आणि उमेदवार हेमंत पाटील हे आज वसमत येथे आले होते. तिघांनी अॅड. शिवाजी जाधव यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केली. यानंतर जाधव यांनी आपण लोकसभेतून माघार घेत असल्याचे जाहीर केले. मात्र येणाऱ्या विधानसभेत मीच उमेदवार असणार असे सूचक वक्तव्य केले.
मुंदडा यांच्या उमेदवारीची सुरुवातीला चर्चा
शिवसेनेच्या वतीने डॉ. जयप्रकाश मुंदडा यांना उमेदवारी निश्चित झाल्याची सुरुवातीला चर्चा होती. त्यामुळेच पाटील यांनी अॅड. जाधव यांना अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहण्याची गळ घातल्याची चर्चा मतदार संघात सुरु झाली होती. मात्र नाट्यमय घडामोडीत सेनेचे तिकीट हेमंत पाटील यांना मिळाले. यामुळे सारे चित्र पालटून ज्यांना उभे रहा म्हणून गळ घातली आता त्यानांच माघार घेण्यासाठी विनंती करावी लागत असल्याचे दिसले. यातून जर डॉ. मुंदडा हे उमेदवार असते तर पाटील यांचा त्यांच्या अपक्ष उमेदवारीस पाठिंबा असता का ? असाच निघत असल्याची चर्चा आहे.
अॅड. जाधव यांच्या या वक्तव्यासंदर्भात उमेदवार पाटील यांची प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. जाधव यांना तसे बोलायचे नव्हते असे बोलत त्यांनी वेळ मारून नेली. जाधव ही माहिती उघड करत असतांना सेना संपर्कप्रमुख आनंद जाधव यांची शेजाऱ्यांसोबत कुजबूज झाल्याचेही पहावयास मिळाले. या वरून शिवसेनेतील अंतर्गत राजकारण पुन्हा एकदा समोर आले आहे.