Maharashtra Election 2019 : हिंगोली जिल्ह्यात ११ वाजेपर्यंत केवळ १९.५५ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2019 12:57 PM2019-10-21T12:57:16+5:302019-10-21T13:08:12+5:30
चार इव्हीएममध्ये बिघाड
हिंगोली : सकाळी अकरा वाजेपर्यंत हिंगोली जिल्ह्यातील तिन्ही मतदार संघात सरासरी १९.५५ टक्के मतदान झाले आहे. सर्वाधिक मतदान कळमनुरीत होत असून २१.२३ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
हिंगोली मतदार संघात सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत १८.९४ टक्के मतदान झाले आहे. वसमत मतदार संघात १८.४८ टक्के मतदान झाले आहे.
बाभुळगाव येथे एक तासभर मशीन बंद
सेनगाव तालुक्यातील बाभुळगाव येथे एकूण चार बुथवर सकाळी मतदान सुरू झाले. यावेळी बुथ क्रमांक ११३ ची मशीन तांत्रिक बिघाडामुळे सकाळी ९ वाजता अचानक बंद पडली. यावेळी हिंगोली वरून आलेल्या कर्मचाºयांनी मशीन दुरुस्त केली. त्यानंतर सकाळी दहा वाजेपासून सुरळीत मतदान सुरू झाले ११३ क्रमांकाच्या बुथवरील मशीन बिघाडामुळे जवळपास तासभर एका बूथवर मतदान ठप्प होते. असताना मतदारांना ताटकळत थांबावे लागले. काही मतदार मतदान न करताच घरी परतल्याचेही दिसून आले.
फाळेगाव येथे ग्रामस्थांची पोलिसासोबत वाद
फाळेगाव येथील मतदान केंद्रावर सकाळच्या सुमारास मतदान केंद्राच्या परिसरात असलेल्या ग्रामस्थांची बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांसोबतच वाद झाला होता. यामुळे मतदान केंद्र परिसरात काहीवेळ तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू झाली.
सापडगाव येथेही मशिनमध्ये तांत्रिक बिघाड
सेनगाव तालुक्यातील सापडगाव येथील मतदान केंद्रावर ईव्हीएम मशिनमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे मतदारांना दोन तास ताटकळत बसावे लागले. परंतु निवडणूक निर्णय अधिकारी अतुल चोरमारे यांनी ही अफवा असल्याचे सांगितले.
चार इव्हीएममध्ये बिघाड
हिंगोली जिल्ह्यातील तीन विधानसभेत एकूण १ हजार १ मतदान केंद्र आहेत. त्यापैकी ४ मतदान केंद्रांवरील इव्हीएम मशिनमध्ये बिघाड झाल्याने या केंद्रांवरील मतदान प्रक्रिया जवळपास एक ते दोन तास बंद होती. वसमत विधानसभा क्षेत्रातील परळी दशरथे येथील मशिनमध्ये बिघाड झाल्याने दीड तास मतदान बंद होते. मशिन दुरूस्तीनंतर मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू झाली.