आखाडा बाळापुरमध्ये गोवर-रूबेलाची लस घेतलेल्या विद्यार्थ्यांना मळमळ,उलट्यांचा त्रास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 05:51 PM2018-12-08T17:51:28+5:302018-12-08T17:53:29+5:30
दहा दिवसांपासून सुरू असलेल्या मोहिमेत बाळापूर परिसरातील 47 विद्यार्थ्यांना असा त्रास झाल्याची माहिती आहे.
आखाडा बाळापुर ( हिंगोली ) : आखाडा बाळापुर परिसरातील एका विद्यालयातील बालकांना ही लस टोचल्याने मळमळ, उलट्यांचा त्रास झाला. त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचार देण्यात आले. दहा दिवसांपासून सुरू असलेल्या मोहिमेत बाळापूर परिसरातील 47 विद्यार्थ्यांना असा त्रास झाल्याची माहिती आहे.
परिसरात 27 नोव्हेंबर पासून गोवर-रूबेला लसीकरण मोहीम राबविली जात आहे. शाळा -शाळांवर आरोग्य विभागाचे पथक जाऊन लसीकरण करत आहेत. शुक्रवारी येथील एका विद्यालयात लसीकरण मोहीम राबविण्यात आली. गोवर रुबेलाची लस दिल्यानंतर दहा ते पंधरा विद्यार्थ्यांना डोकेदुखी मळमळ उलटीचा त्रास सुरू झाला. विद्यार्थ्यांना तत्काळ इंजेक्शन देऊन उपचार करण्यात आले. त्यानंतरही काही जणांची डोकेदुखी मळमळ न थांबल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
सना फिरोज पठाण (वर्ग 6 वा,रा.कुपटी), दिपाली शिवाजी कळमकर(वर्ग ६वी), रवी प्रकाश गव्हाणे (वर्ग ९ वा रा.येगाव ), मंजूकोर पांडूसिंग बावरी(वर्ग १०वी), शैलेश किशोर घोंगडे(वर्ग ५वा रा. कान्हेगाव) यांच्यासह आठ विद्यार्थ्यांवर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक करंडे सर या ठिकाणी प्रत्यक्ष हजर असून वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जाधव त्यांच्यावर उपचार करत आहेत. लसीकरणामुळे त्रास होत असल्याच्या अफवा तेजीत पसरत आहेत. परंतु लसीकरणाच्या वेळी काही कारणामुळे अपवादात्मक ठिकाणी मुलांना त्रास होऊ शकतो .परंतु हा त्रास म्हणजे लसीमुळे झालेले रिॲक्शन नाही असे डॉक्टर जाधव यांनी सांगितले आहे. आतापर्यंत वेगवेगळ्या शाळांमधील 47 विद्यार्थ्यांना या लसीमुळे त्रास झाला आहे.