शिक्षकांच्या नव्या बदली धोरणाविरोधात संघटना आक्रमक, तीन टप्यात करणार आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 04:44 PM2017-10-26T16:44:40+5:302017-10-26T16:47:54+5:30
शिक्षक बदली धोरणाविरोधात सर्वच शिक्षक संघटना एकवटल्या असून बदली धोरणाचा विरोध करण्यासाठी शिक्षकांच्या वतीने तीन टप्यांत आंदोलन करण्यात येणार आहे.
कळमनुरी ( हिंगोली): शिक्षक बदली धोरणाविरोधात सर्वच शिक्षक संघटना एकवटल्या असून बदली धोरणाचा विरोध करण्यासाठी शिक्षकांच्या वतीने तीन टप्यांत आंदोलन करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली असल्याची माहिती शिक्षक संघटना समन्वय समितीचे जिल्हा सचिव सुभाष जिरवणकर यांनी दिली.
शिक्षक बदलीच्या नवीन धोरणाला शिक्षकांकडून सुरूवातीपासूनच विरोध केला जात आहे. तरीही शासन बदलीचा रेटा लावत आहे. या संदर्भात आज शिक्षक समन्वय समितीची बैठक घेण्यात आली. बैठकीत बदल्याविरोधात आंदोलनाची दिशा ठरविण्यात असून नवीन बदली धोरणात दुरूस्ती करण्यात यावी, या मागणीसाठी आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात ४ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.
यावेळी शिक्षकांच्या नवीन वरिष्ठ व निवड श्रेणीचा आदेश रद्द करावा, अंशदायी पेन्शन योजना बंद करून जुनी पेन्शन योजना लागू करावी, अनावश्यक आॅन लाइन कामे बंद करावी आदी मागण्या संघटनेच्या वतीने केल्या जाणार आहेत. मोर्चात जिल्ह्यातील जवळपास ४ हजार शिक्षक सहभागी होणार आहेत. मोर्चानंतरही शिक्षकांच्या मागण्या मान्य न केल्यास दुस-या टप्प्यात आझाद मैदान येथे आंदोलन तर तिस-या टप्प्यात सामुहिक रजा आंदोलन केले जाणार असल्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे.
आंदोलनात १७ संघटनांचा सहभाग राहणार असून सदरचे आंदोलन हे महाराष्ट्र राज्य प्राथमिक संघटना समन्वय समितीच्या वतीने केले जाणार आहे. शिक्षकांच्या नवीन बदली धोरणाबाबत शासनासोबत अनेकदा चर्चा झाली. परंतु, यावर कोणताही तोडगा निघाला नसल्याने शिक्षक संघटनांनी अखेर आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे.