वसमत येथे ट्रक्टरवर कार आदळून अपघात, तीन जण जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 11:39 AM2018-01-12T11:39:30+5:302018-01-12T15:44:10+5:30
शहरालगत नांदेड रोडवर पहाटे तीन वाजता कार व ट्रक्टरच्या भीषण अपघातात 3 जण जागीच ठार झाले आहेत. सर्व मृत जिंतूर तालुक्यातील आसेगावची रहिवासी आहेत .
वसमत ( हिंगोली ) : नांदेड - परभणी राष्ट्रीय महामार्गावर वसमत येथील मयूर हॉटेल समोर कार उसाच्या ट्रॅक्टरवर आदळली. या अपघातात कारमधील तिघेही जागीच ठार झाले आहेत. अपघातग्रस्त कारचा समोरील भागाचा चेंदामेंदा झाला आहे. हा अपघात पहाटे ३ च्या सुमारास घडला. अपघातातील तिन्ही मयत जिंतूर तालुक्यातील आसेगाव येथील आहेत.
एम. एच. २२ यु. ६४७९ ही कार गुरूवारी मध्यरात्री नंतर नांदेडकडून परभणीकडे निघाली होती. पहाटे ३ च्या सुमासरास वसमत तालुक्यातील माळवटा शिवाराकडून ऊस घेवून पूर्णा कारखान्याकडे निघालेल्या ट्रॅक्टरच्या मागच्या ट्रॉलीवर आदळली. हा अपघात एवढा जबरदस्त होता की, कारच्या धडकेने ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचे पाटे तुटून चाकही निखळले व उसासह ट्रॉली पलटी झाली. तर ट्रॉलीच्या आतमध्ये शिरलेला कारचा समोरच्या भागाचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. कारचे पार्ट घटनास्थळावर दूरपर्यंत विखरले गेले होते.
कारमधील गणेश पिराजी गुंजकर(३२), सोपान एकनाथ पवार (३५) व दत्ता सुंदर पवार (३८) हे तिघेही जागीच ठार झाले. मयत हे तिघेही जिंतूर तालुक्यातील आसेगाव येथील रहिवासी आहेत. घटनेचे वृत्त समजताच पोलीस निरीक्षक उदयसिंह चंदेल, पोलीस उपनिरीक्षक एम.व्ही. मोरे, जमादार शिंदे, चव्हाण, शेख महेमबुब, सवंडकर, ठोंबरे आदी कर्मचारी घटनास्थळी धावले. अपघात ग्रस्त कार बाहेर काढण्यासाठी दोर बांधून ट्रॅक्टरने ओढून काढावी लागली.
या प्रकरणी मयताचे चुलते पांडुरंग लक्ष्मण पवार यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर क्र. एम.एच.२६ व्ही. ८७२१ चा चालक पांडुरंग भीमराव पवार (रा. शहापूर) विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.