आमच्या वेदना समजून घ्या म्हणत विद्यार्थिनींनी दिला पालकमंत्र्यांच्या डोक्यावर हंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 10:56 AM2019-05-10T10:56:41+5:302019-05-10T10:58:03+5:30
आमच्या वेदना समजून घ्यायच्या तर एकदा तुम्ही डोक्यावर हंडा घेऊन पाहा
हिंगोली : गावात टँकर येते मात्र अपुरेच पाणी मिळते. रोज डोक्यावर हंडा घेतल्याशिवाय पर्याय नाही. आमच्या वेदना समजून घ्यायच्या तर एकदा तुम्ही डोक्यावर हंडा घेऊन पाहा, असे गाऱ्हाणे मांडत कळमनुरी तालुक्यातील शिवणी खु. येथील प्रज्ञा भगत व शालिनी भगत या महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी गुरुवारी पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्या डोक्यावर रिकामा हंडा दिला.
मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार पालकमंत्री कांबळे हे दुष्काळ पाहणी दौरा करीत आहेत. टंचाईग्रस्त शिवणी येथे त्यांनी गुरुवारी भेट दिली. हंडे घेऊनच महिलांनी त्यांचे स्वागत केले. प्रज्ञा व शालिनी या महाविद्यालयीन तरुणींनी प्रातिनिधिक स्वरुपात महिलांचे गाऱ्हाणे मांडले. त्या म्हणाल्या, पाण्यासाठी कॉलेज सोडण्याची वेळ आली. सकाळी उठल्यापासून ही समस्या सुरू होते. टँकर वेळेवर येत नाही. आले तर मोठी रांग लागते. गावाला टँकरचे पाणी पुरेसे होत नाही. कुणाला मिळते तर कुणाला मिळतही नाही. पिण्यालायक नसलेले हेच पाणी प्यावेही लागते. असे गाऱ्हाणे दोघींनी मांडताच बाजूलाच उभ्या असलेल्या सत्यभामा सूर्यवंशी या आजीने पालकमंत्र्यांसमोर पाण्याने भरलेला तांब्या ठेवला. पालकमंत्र्यांनी ते पाणी प्यायल्यानंतर लागलीच गावकऱ्यांसाठी एक टँकर फिल्टर केलेले पाणी व दुसरे टँकर सांडपाण्यासाठी देण्याचे आदेश गटविकास अधिकाऱ्यांना दिले. पालकमंत्री उपविभागीय अधिकाऱ्यांनाही दूरध्वनीवरून बोलले. यावेळी त्यांच्यासमवेत आ.तान्हाजी मुटकुळे, माजी आ.गजानन घुगे, नगरसेवक गणेश बांगर, बीडीओ खिल्लारी आदी हजर होते.
दोघींना वसतिगृहात प्रवेश
प्रज्ञा भगत व शालिनी भगत या दोघींना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळवून दिला जाईल, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले.