महिला हॉकी खेळाडूंना एक लाखाचे पारितोषिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 04:07 AM2017-11-07T04:07:36+5:302017-11-07T04:07:56+5:30
१३ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा आशिया चषक पटकावलेल्या भारतीय महिला हॉकी संघातील प्रत्येक खेळाडूला एक लाख रुपये रोख पारितोषिक देण्याची घोषणा हॉकी इंडियाच्या वतीने करण्यात आली.
नवी दिल्ली : १३ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा आशिया चषक पटकावलेल्या भारतीय महिला हॉकी संघातील प्रत्येक खेळाडूला एक लाख रुपये रोख पारितोषिक देण्याची घोषणा हॉकी इंडियाच्या वतीने करण्यात आली. रविवारी झालेल्या अत्यंत रोमांचक सामन्यात भारतीय महिलांनी चीनचे कडवे आव्हान पेनल्टी शूटआऊटमध्ये ५-४ असे परतावून बाजी मारली. विशेष म्हणजे २००४ नंतर पहिल्यांदाच आशिया चषक पटकावलेल्या भारतीय महिलांनी पुढील वर्षी रंगणाºया विश्वचषक स्पर्धेसाठीही थेट प्रवेश मिळवला.
हॉकी इंडियाने सोमवारी १८ सदस्यीय भारतीय महिला संघाव्यतिरिक्त मुख्य प्रशिक्षकांनाही एक लाख रुपये आणि अन्य सहयोगी स्टाफला प्रत्येकी ५० हजार रुपये रोख पारितोषिक देण्याची घोषणा केली. संपूर्ण स्पर्धेत दबदबा राखलेल्या भारतीय संघाने एकही सामना न गमावता २८ गोलचा वर्षाव करताना भारतीय महिलांनी ५ गोल स्वीकारले.
भारतीय महिला संघाने पुन्हा एकदा आशिया चषक पटकावून मोठे यश मिळवून दिले आहे. त्यांनी या स्पर्धेत शानदार खेळाचे प्रदर्शन करीत चषक पटकावून आगामी विश्वचषक स्पर्धेसाठीही पात्रता मिळवली. कर्णधार राणी आणि संपूर्ण संघ, सहयोगी स्टाफ आणि कोचिंग स्टाफ यांचे या विजयासाठी हॉकी इंडियाकडून खूप अभिनंदन.
- मोहम्मद मुश्ताक अहमद, महासचिव - हॉकी इंडिया.