बलाढ्य आॅस्ट्रेलिया संघाचा दुबळ्या आयर्लंडविरुद्ध २-१ असा संघर्षपूर्ण विजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 06:43 AM2018-12-01T06:43:55+5:302018-12-01T06:44:18+5:30
भुवनेश्वर : बलाढ्य आॅस्ट्रेलियाने शुक्रवारी येथे कमकुवत आयर्लंडविरुद्ध २-१ ने संघर्षपूर्ण विजय मिळवत हॉकी विश्वकपमध्ये जेतेपदाची हॅट््ट्रिक पूर्ण करण्याच्या ...
भुवनेश्वर : बलाढ्य आॅस्ट्रेलियाने शुक्रवारी येथे कमकुवत आयर्लंडविरुद्ध २-१ ने संघर्षपूर्ण विजय मिळवत हॉकी विश्वकपमध्ये जेतेपदाची हॅट््ट्रिक पूर्ण करण्याच्या मोहिमेची सुरुवात केली.
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या आॅस्ट्रेलियाने २०१० व २०१४ मध्ये जेतेपद पटकावले होते. मात्र त्यांना शुक्रवारी झालेल्या लढतीत लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. जागतिक क्रमवारीत दहाव्या स्थानावर असलेल्या आयर्लंडने आक्रमण व बचावात शानदार कामगिरी करीत आॅस्ट्रेलियाला झुंजवले. आॅस्ट्रेलियाला पेनल्टी कॉर्नरमध्येही चांगली कामगिरी करता आली नाही. त्यांना पाचपैकी केवळ एकावर गोल नोंदवता आला. आॅस्ट्रेलियातर्फे ब्लॅक गोवर्स (११ वा मिनिट) व टीम ब्रांड (३४ वा मिनिट) यांनी गोल केले. आयर्लंडतर्फे एकमेव गोल शेन ओ डोनोगे (१३ वा मिनिट) याने केला.
दोन्ही संघांमध्ये बराच फरक आहे, पण आयर्लंडने पहिल्या दोन क्वॉर्टरमध्ये आॅस्ट्रेलियाला बरोबरीची टक्कर दिली. आयर्लंडने सर्वप्रथम गोलजाळ्यावर हल्ला चढविला, पण आॅस्ट्रेलियाचा गोलरक्षक अँड्रयू चार्टरने सीन मर्रे व मॅथ्यू नेल्सन या दोघांचे फटके अडवत संकट टाळले. यानंतर आॅस्ट्रेलियाला पेनल्टी कॉर्नर मिळाला. त्यावर गोवर्सने गोल केला. आॅस्ट्रेलियाला केवळ दोनच मिनिट आघाडी कायम राखता आली. ओ डोनोगेने मर्रेच्या पासवर चेंडूला गोलजाळ्याचा मार्ग दाखवित संघाला १-१ अशी बरोबरी साधून दिली.
दुसऱ्या क्वॉर्टरमध्येही उभय संघांनी आक्रमक खेळ केला, पण गोल नोंदवता आला नाही. या क्वॉर्टरमध्ये आयर्लंडनेही पेनल्टी कॉर्नर गमावला, तर आॅस्ट्रेलियालाही अखेरच्या क्षणी दोन पेनल्टी कॉर्नरवर अपयशी ठरले. आॅसीने मध्यंतरानंतर चौथ्या मिनिटाला गोल नोंदवित घेतलेली आघाडी अखेरपर्यंत कायम राखली. (वृत्तसंस्था)