चीनला चक्रीवादळाचा तडाखा, मकाऊ आणि हाँगकाँगमधील जनजीवन विस्कळीत ; 12 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2017 05:17 PM2017-08-24T17:17:19+5:302017-08-24T17:59:44+5:30
मकाऊ, दि. 24 - काल बुधवारी चीनच्या किनारपट्टीला चक्रीवादळ धडकले आहे. या वादळामुळे जोरदार पाऊस कोसळत आहे. यामुळे मकाऊ ...
मकाऊ, दि. 24 - काल बुधवारी चीनच्या किनारपट्टीला चक्रीवादळ धडकले आहे. या वादळामुळे जोरदार पाऊस कोसळत आहे. यामुळे मकाऊ आणि हाँगकाँगमधील नद्यांना महापूर आला आहे. जोरदार वारा आणि मुसळधार पावसामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मिळालेल्या वृत्तानुसार दक्षिण चीनमध्ये आलेल्या या वादळामुळे आतापर्यंत 12 जणांचा मुत्यू झाला आहे. मकाऊच्या पोर्तुगीज वसाहतीत आठ जणांचा बळी गेला असून पावसाची ही स्थिती पाहता मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. पावसामुळे मृत पावलेल्यामध्ये एका 62 वर्षीय वृद्धाचा समावेश आहे. पावसामध्ये एका कारने धडकल्यामुळे 45 वर्षीय व्यक्तीचाही मृत्यू झाला. मकाऊमध्ये पावसामुळे भींत अंगावर कोसळून एका 30 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
दक्षिण चीनमध्ये आलेल्या ह्या चक्रीवादळाची तीव्रता ही दहाव्या श्रेणीतील असल्याचे सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या चक्रीवादळामुळे 450 विमानाची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. काल मकाऊ आणि हाँगकाँगमधील सर्व शाळा, सरकारी कार्यालये आणि स्टॉक एक्सचेंज बंद होते. समुद्र किनाऱ्याला धडकलेल्या चक्रीवादळामुळे समुद्रात मोठ्या लाठा उसळत आहेत. त्यामुळे येथील मच्छीमारी बंद करण्यात आली आहे.
मकाऊ आमि हाँगकाँगमधील काही भागात काल वीज, मोबाइल आणि इंटरनेट सेवा ठप्प झाली होती. या चक्रीवादळाचा केंद्रबिंदू असलेल्या भागात 155 किमी प्रती तास वेगाने वारा वाहत आहे. तुफानी वारा आणि मुसळधार पावसामुळे येथील प्रसिद्ध विक्टोरिया हार्बरला त्याचा फटका बसला आहे. गेल्या पाच वर्षातील चीनमध्ये आलेलं हे सर्वात मोठ वादळ असल्याचे स्थानिक प्रसारमाध्यमांनी सांगितले आहे.
चक्रीवादळामुळे लोकांचे जनजीवन विस्कळीत झाल्याचे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटो आणि व्हिडिओतून दिसून येत आहे.
दरम्यान गेल्यावर्षीही चीनमध्ये पावसाने थैमान घातले होते. यामध्ये 111 लोकांचा मृत्यू झाला होता. चीनच्या वायव्येकडील शानाक्सी प्रांतात मुसळधार पावसाने थैमान घातले होते. दरड कोसळल्याने व वाहून गेल्याने 111 लोक मरण पावले होते तर 167 लोक बेपत्ता झाले होते.