73 टक्के लोकांची पाकिस्तानपासून वेगळं होण्याची इच्छा, सर्व्हे करणा-या वृत्तपत्राला पाकिस्तान सरकारने ठोकलं टाळ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2017 01:33 PM2017-09-13T13:33:41+5:302017-09-13T13:33:41+5:30
73 टक्के लोकांनी पाकिस्तानात राहण्याची इच्छा नसून, विरोधात मत व्यक्त करत स्वातंत्र्याची मागणी केली आहे. वृत्तपत्राने केलेल्या सर्व्हेनंतर, पाकिस्तानात खळबळ माजली आहे. यामुळे पाकिस्तान सरकारने कोणताही पूर्वसूचना न देता वृत्तपत्राला टाळं ठोकलं आहे.
इस्लामाबाद, दि. 13 - पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये सर्वात जास्त विक्री होणारं उर्दू वृत्तपत्र डेली मुजादालवर पाकिस्तान सरकारने बंदी आणली आहे. पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील रावलकोट येथून प्रसिद्द होणा-या या वृत्तपत्राने पीओकेमधील लोकांशी संवाद साधत एक सर्व्हे केला होता. सर्व्हेदरम्यान पाकिस्तानात राहण्यासंबंधी तुमचं काय मत आहे ? असा प्रश्न विचारण्यात आला होता. रिपब्लिक चॅनेलने दिलेल्या वृत्तानुसार, 73 टक्के लोकांनी पाकिस्तानात राहण्याची इच्छा नसून, विरोधात मत व्यक्त करत स्वातंत्र्याची मागणी केली आहे. वृत्तपत्राने केलेल्या सर्व्हेनंतर, पाकिस्तानात खळबळ माजली आहे. यामुळे पाकिस्तान सरकारने कोणताही पूर्वसूचना न देता वृत्तपत्राला टाळं ठोकलं आहे.
रिपब्लिक चॅनेलने यानंतर वृत्तपत्राचे संपादक हारिस क्वादिर यांच्याशी संवाद साधला. जेव्हा त्यांना लोकांचं स्वातंत्र्यांवर काय म्हणणं आहे असं विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की, 'आम्ही लोकांना दोन वेगवेगळे प्रश्न विचारले होते. पहिला प्रश्न होता की 1948 मध्ये काश्मीरला मिळालेला दर्जा बदलला जावा असं त्यांना वाटतं का ? या प्रश्नावर अनेकांचं सकारात्मक उत्तर होतं'. त्यांनी सांगितलं की, दुसरीकडे 73 टक्के लोक काश्मीर पाकिस्तापासून स्वतंत्र झाला पाहिजे या मताचे आहेत.
हा सर्व्हे प्रकाशित करण्यात आल्यानंतर पाकिस्तान सरकारने सर्वात आधी आपल्याला नोटीस पाठवून धमकावलं असल्याचं संपादक हारिस क्वादिर यांनी सांगितलं आहे. यानंतर त्यांनी माझ्या कार्यालयाला टाळं ठोकलं असं संपादक हारिस क्वादिर बोलले आहेत.
जवळपास 10 हजार लोकांमध्ये हा सर्व्हे करण्यात आला. या सर्व्हेसाठी पाच वर्षांचा वेळ लागला. या सर्व्हेत जवळपास 73 टक्के लोकांनी पाकिस्तानपासून वेगळं होण्यावर सहमती दर्शवली आहे. पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधून स्वातंत्र्य मिळावं यासाठी याआधीही अनेकांनी आवाज दिला आहे. सिंधू आणि बलुचिस्तानमध्येही स्वातंत्र्याची मागणी झाली होती.
वृत्तपत्राने सर्व्हे प्रकाशित केल्यानंतर पाकिस्तानात खळबळ माजली आहे. पाकिस्तान सरकारने सर्व्हेचा धसका घेत थेट वृत्तपत्रावरच कारवाईचा बडगा उगारला आहे. कोणताही पूर्वसूचना न देता पाकिस्तान सरकारने सर्वात जास्त खप असलेलं हे वृत्तपत्र बंद केलं आहे. सरकारच्या निर्णयावर लोकांनी रोष व्यक्त केला आहे.