अन् अलार्म क्लॉकमुळे तो दहशतवादी हल्ल्यातून बचावला...
By admin | Published: December 18, 2014 12:55 PM2014-12-18T12:55:02+5:302014-12-18T13:43:36+5:30
अलार्म क्लॉक वेळेवर न वाजल्याने उठायला उशीर झाला आणि दाऊद शाळेत गेला नाही, मात्र त्याचमुळे तालिबान्यांच्या हल्ल्यातून त्याचा जीव वाचला.
Next
ऑनलाइन लोकमत
पेशावर, दि. १८ - पेशावरमधील शाळेत तालिबान्यांनी घातलेल्या थैमानामुळे अनेक निष्पाप विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागला मात्र अलार्म क्लॉक न वाजल्यामुळे एका विद्यार्थ्याचा जीव वाचल्याची घटनाही येथेच घडली आहे. लष्करी शाळेत नववीत शिकणारा १५ वर्षीय दाऊद इब्राहिम अलार्म क्लॉक न वाजल्यामुळे वेळेवर उठू शकला नाही आणि त्याला शाळेला दांडी मारावी लागली. मात्र त्याचमुळे तो सुदैवी ठरला. त्याच्या वर्गातील बहुसंख्य विद्यार्थी मारले गेले, मात्र शाळेत न गेल्याने दाऊदचा जीव मात्र वाचला.
दाऊद सोमवारी संध्याकाळी कुटुंबियांसह एका लग्नाला गेला होता. मात्र सकाळी त्याचा अलार्म वेळेवर न वाजल्याने त्याला उठायला उशीर झाला आणि त्याला शाळेत जाता आले नाही. मात्र थोड्याच वेळात त्याला दहशतवाद्यांनी शाळेवर केलेल्या हल्ल्याची बातमी कळली आणि शाळेत न गेल्याने जीवावरच्या किती मोठ्या संकटातून आपण वाचलो याची जाणीव त्याला झाली.
' दाऊद सध्या कोणाशीच बोलत नाहीये. त्याच्या वर्गातील एकही विद्यार्थी वाचू शकला नाही. त्याने आज त्याच्या सहका-यांना शेवटचा निरोप दिला. तेव्हापासूनच तो कोणाशीच तो बोलण्याच्या मनस्थितीत नाहीये,' असे त्याच्या भावाने सांगितले.
मंगळवारी तालिबानी दहशतवाद्यांनी पेशावरमधील लष्करी शाळेत घुसून थैमान घातले. शाळेच्या वर्गांमध्ये शिरून अतिरेक्यांनी आपल्याकडील रायफलींमधून अंधाधुंद गोळीबार सुरू केला. जे कोणी त्यांच्या गोळीबाराच्या पट्ट्यात आले त्यांची कलेवरे शाळेच्या आवारात इतस्तत: विखुरली गेली. या हल्ल्यात निष्पाप विद्यार्थ्यांसह १४१ जणांनी जीव गमावला आहे.