रोहिंग्यांच्या प्रश्नावर बांगलादेश आणि म्यानमारमध्ये चर्चेला सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2017 04:36 PM2017-11-22T16:36:41+5:302017-11-22T16:45:52+5:30
म्यानमारमधील हिंसाचार आणि अशांततेला घाबरुन बांगलादेशात गेलेल्या रोहिंग्यांच्या प्रश्नावर या दोन्ही देशांनी चर्चा सुरु केली आहे. रोहिंग्या लवकरात लवकर राखिन प्रांतामध्ये परत जावेत यासाठी जगभरातील देश या चर्चेवर लक्ष ठेवून आहेत.
ढाका- म्यानमारमधील हिंसाचार आणि अशांततेला घाबरुन बांगलादेशात गेलेल्या रोहिंग्यांच्या प्रश्नावर या दोन्ही देशांनी चर्चा सुरु केली आहे. रोहिंग्या लवकरात लवकर राखिन प्रांतामध्ये परत जावेत यासाठी जगभरातील देश या चर्चेवर लक्ष ठेवून आहेत. बांगलादेशात निर्वासित छावण्यांमध्ये राहणाऱ्या रोहिंग्यांना अजूनही पुरेशा सोयी मिळालेल्या नाहीत. संयुक्त राष्ट्रासह इतर अनेक संस्था त्यांच्या मदतीसाठी सरसावलेल्या आहेत.
बांगलादेशचे परराष्ट्र सचिव एम शहिदुल हक हे बांगलादेशच्या शिष्टमंडळाचे प्रमुख आहेत तसेच बांगलादेशचे म्यानमारमधील राजदूत एम, सुफिउर रेहमान, गृह मंत्रालय, पंतप्रधान कार्यालय, परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारीही या शिष्टमंडळात आहेत. बांगलादेशचे परराष्ट्र मंत्री ए.एच. महमूद अली यांनी आपण या चर्चेबाबत सकारात्मक असल्याचे सांगितले आहे. गुरुवारी मेहमूद अली आणि म्यानमारच्या स्टेट कौन्सीलर आंग सान सू की अंतिम चर्चा करतील.
तरंगत्या शवपेट्या-
बांगलादेशात गेलेल्या रोहिंग्यांप्रमाणेच दोन वर्षांपुर्वी त्रास वाचविण्यासाठी हजारो रोहिंग्या मुसलमानांनी मिळेल त्या बोटींनी म्यानमारचा किनारा सोडला होता. थायलंड, इंडोनेशिया अशा कोणत्याही दिशांना त्यांच्या बोटी गेल्या. दोन तीन महिन्यांहून अधिक काळ बोटींवर काढल्यानंतर काहींच्या बोटी थायलंडच्या किनाऱ्याला लागल्या. त्यांना निर्वासितांच्या छावण्यांमध्ये ठेवले गेल. मात्र अजूनही शेकडो रोहिंग्या थायलंड, इंडोनेशिया आसरा देईल अशा अपेक्षेत फिरतच आहेत. या बोटी म्हणजे बंगालच्या उपसागरात तरंगणाऱ्या शवपेट्याच झाल्या आहेत. हे गरिब लोक कोणालाच नको आहेत. शांततेचे नोबेल मिळविणाऱ्या आंग सान सू की यांनीही या प्रश्नावर मौन धारण केले आहे. बौद्ध धर्मियांचे सर्वोच्च गुरु दलाई लामा यांनीही यामध्ये हस्तक्षेप करुन हा प्रश्न सोडावावा अशी विनंती केली होती, मात्र तरिही म्यानमारने यावर ठोस भूमिका घेतली नाही.
It's now month 4 since Myanmar began its ramped up effort to expel or exterminate Rohingya Muslims.
— CJ Werleman (@cjwerleman) November 21, 2017
Nearly one million seek refuge. Here's another 700 that arrived on Bangladesh's border yesterday after walking 25 consecutive days. pic.twitter.com/naaZE7t3Lv
सुमारे १३ लाख लोकसंख्येचा असणारा रोहिंग्या हा एक मुस्लीम संप्रदाय आहे. म्यानमारमधील राखिने प्रांतात यांची सर्वात जास्त वस्ती होती. मात्र म्यानमारने या मुस्लीमांना नागरिकत्व देण्यास नकार दिला. त्याचप्रमाणे म्यानमारमध्ये त्यांच्यावर शिक्षण, विवाह, जमिन अधिग्रहण अशा अनेक क्षेत्रांवर बंधने लादली आहेत. स्थानिक बौद्ध व रोहिंग्या यांचे संबंधही नेहमीच तणावाचे राहिले आहेत. वांशिक आणि भाषिक कारणांमुळे या दोन्ही गटांमध्ये नेहमीच संघर्ष झालेला आहे. २०१२ साली दोन्ही वांशिक गटांमध्ये झालेल्या संघर्षामध्ये शेकडो नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आणि सुमारे एक लाख चाळीस हजार नागरिकांना घरे सोडावी लागली. गेल्या तीन वर्षांमध्ये एक लाख वीस हजार रोहिंग्यांनी स्थलांतर केल्याचा युएनचा अंदाज आहे. रोहिंग्याना आता या जगात आपले कोण नाही याची जाणिव होत चालली आहे. त्यांना स्वीकारायला कोणीच उत्सुक नाही. इंडोनेशियासह अनेक देशांनी जबाबदारी झटकल्याने युएननेही चिंता व्यक्त केली आहे. सतत पाण्यावरतीच भरकटत राहिल्याने रोहिंग्यांना बोट पिपल अशा नव्या संज्ञेने ओळखले जात आहे. रोहिंग्यांच्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी थायलंडमध्ये या महिन्यात होऊ घातलेल्या बैठकीस उपस्थित राहणार नाही असे म्यानमारने कळवून चर्चेचा प्रस्तावही धुडकावला आहे.
Hundreds of #Rohingya orphans queue for food in Tankhali Refugee Camp, #Bangladesh after they fled #Myanmar's campaign of genocide where they parents are either killed or missing. #UniversalChildrendsDay#ChildrenDay#Genocide#AungSanSuuKyi#WithRefugees#EthnicCleansingpic.twitter.com/fH8XZqSCSH
— EU ROHINGYA COUNCIL (@the_erc) November 20, 2017