'या' देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी फुटबॉलपटू झाला विराजमान
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2018 06:01 PM2018-01-23T18:01:45+5:302018-01-23T18:02:12+5:30
माजी फुटबॉलपटू जॉर्ज विआ यांची लायबेरिया देशाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. 2002नंतर फुटबॉलला राम राम ठोकल्यानंतर जॉर्ज विआ हे राजकारणात सक्रिय झाले. ते लायबेरियाच्या संसदेत सिनेटरही आहेत.
मोनरोव्हिया- माजी फुटबॉलपटू जॉर्ज विआ यांची लायबेरिया देशाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. 2002नंतर फुटबॉलला राम राम ठोकल्यानंतर जॉर्ज विआ हे राजकारणात सक्रिय झाले. ते लायबेरियाच्या संसदेत सिनेटरही आहेत. 26 डिसेंबर 2017 रोजी लायबेरियात राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक झाली होती. या निवडणुकीत प्रतिस्पर्धी असलेल्या जोसेफ बोआकाई यांचा पराभव करत जॉर्ज यांनी त्यांच्याहून 60 टक्के जास्त मते मिळवली.
जॉर्ज विआ निवडणूक जिंकल्यानंतर मोनरोव्हियामध्ये एकच जल्लोष करण्यात आला होता. जॉर्ज विआ यांनी आज लायबेरियाच्या राष्ट्राध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला आहे. जॉर्ज विआ यांनी माजी राष्ट्राध्यक्ष एलेन जॉन्सन यांची जागा घेतली आहेत. निवडणुकीतील विजयानंतर जॉर्ज यांनी ट्विटरवरून आनंदही व्यक्त केला आहे. त्यानंतर ते जनतेला उद्देशून म्हणाले होते, लायबेरियाच्या विकासासाठी आपण एकत्र काम करण्याची गरज आहे.
जगाला लायबेरियाची खरी क्षमता दाखवून देण्याची ही उत्तम संधी आहे. आफ्रिकन आणि आंतरराष्ट्रीय नेते आणि भागीदारांसाठी आता लायबेरियाचे दरवाजे खुले झाले आहेत. माझ्याकडे लायबेरियाला प्रगतिपथावर नेण्यासाठी अनेक योजना आहेत. त्यामुळे आता सकारात्मक विचारांसह लायबेरियाला प्रगतीच्या मार्गावर नेण्यासाठी तयार राहा.