सावधान..! प्लॅस्टिक वापरल्यास चार वर्षे तुरुंग किंवा 26 लाखांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 04:32 AM2017-10-06T04:32:43+5:302017-10-06T04:35:14+5:30
नष्ट न होणा-या प्लॅस्टिकचे उत्पादन, विक्री व वापर यासाठी चार वर्षे तुरुंग किंवा ४० हजार डॉलर्सचा (३१ हजार पौंड) दंड या कायद्यान्वये होईल.
प्रदूषणाला आवर घालण्यासाठी केनियाने प्लॅस्टिक पिशव्यांच्या वापराविरोधात कठोर कायदा केला आहे. नष्ट न होणा-या प्लॅस्टिकचे उत्पादन, विक्री व वापर यासाठी चार वर्षे तुरुंग किंवा ४० हजार डॉलर्सचा (26,08,600 रुपये) दंड या कायद्यान्वये होईल. केनियाच्या पर्यावरणमंत्री ज्युडी वाखुग्नू यांनी अशा प्लॅस्टिक उत्पादकांवर आमचे लक्ष असेल, असे सांगितले. सामान्य लोकांना या कायद्यापासून काही त्रास होणार नाही. जगातील ज्या ४० देशांनी प्लॅस्टिक पिशव्यांवर पूर्ण वा अंशत: बंदी घातली आहे त्यात चीन, फ्रान्स, रवांडा, इटली आदींचा समावेश आहे.
प्लॅस्टिकच्या पिशव्या वाहून समुद्रात येतात, कासवांचा दम कोंडतात, समुद्र पक्ष्यांचा श्वास गुदमरवून टाकतात. डॉल्फिन व देवमाशांच्या पोटात त्या जातात. या सागरी जिवांना उपासमारीला तोंड द्यावे लागते आणि अखेर जीवही गमवावा लागतो. प्लॅस्टिक पिशव्या नष्ट व्हायला ५०० ते एक हजार वर्षे लागतात. आम्ही याच पद्धतीने प्लॅस्टिकचा वापर करीत राहिलो, तर २०५०पर्यंत आमच्या समुद्रात माशांपेक्षा प्लॅस्टिक अधिक असेल, असे हबीब एल-हाबर म्हणाले. ते केनियात संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण कार्यक्रमात काम करतात.
केनियामध्ये या बंदीचे काही स्वागत झालेले नाही. केनियातील प्लॅस्टिक उत्पादक संघटनेने म्हटले आहे की, या कायद्यामुळे १७६ कारखाने बंद पडून ६० हजार लोकांचा रोजगार जाईल. ग्राहक भाजी-फळे घरी कसे नेतील, असे सांगून संघटनेच्या प्रवक्त्याने या बंदीचे भयंकर दुष्परिणाम होणार असल्याचे म्हटले आहे. केनिया हा आफ्रिकेमध्ये प्लॅस्टिकचा मोठा निर्यातदार देश आहे. परंतु आता सुपर मार्केट्सनी ग्राहकांना कापडी पिशव्या द्यायला सुरुवात केली आहे.