चीनकडून युद्धाची तयारी? तिबेटमध्ये पाठवल्या ब्लड बँक, ग्लोबल टाइम्सचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2017 11:35 PM2017-08-16T23:35:38+5:302017-08-16T23:37:05+5:30
डोकलाममधील विवादानंतर चिनने सुरू केलेले युद्धाच्या धमक्यांचे सत्र थांबता थांबत नाही आहे. वारंवार धमक्या देऊनही डोकलाममधून माघार घेण्यास तयार नसलेल्या भारतासोबत युद्ध करण्याची तयारी चीनने पूर्ण केली असून, युद्धाच्या तयारीचा भाग म्हणून आवश्यक असणारा रक्तसाठा गोळा करण्यास सुरुवात केली आहे.
बीजिंग, दि. 16 - डोकलाममधील विवादानंतर चिनने सुरू केलेले युद्धाच्या धमक्यांचे सत्र थांबता थांबत नाही आहे. वारंवार धमक्या देऊनही डोकलाममधून माघार घेण्यास तयार नसलेल्या भारतासोबत युद्ध करण्याची तयारी चीनने पूर्ण केली असून, युद्धाच्या तयारीचा भाग म्हणून आवश्यक असणारा रक्तसाठा गोळा करण्यास सुरुवात केली आहे, असा दावा चिनचे सरकारी वृत्तपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्समध्ये प्रकाशित झालेल्या एका वृत्ता हा दावा करण्यात आला आहे.
चिनमधील विविध प्रांतांमध्ये रक्तदान शिबिरे आयोजित करून रक्त गोळा करण्यात येत आहे. तसेच देशातींल रुग्णालयांनीसुद्धा रक्ताचा वापर नियंत्रित करण्यास सुरुवात केली आहे. ग्लोबल टाइम्सच्या वृत्तानुसार पीएलएकडून (पीपल्स लिबरेशन आर्मी) ब्लड बँक दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आली आहे. देशातील रक्तसाठा भूकंपाआधी च्योचायको प्रांतात स्थलांतरीत करण्यात आला होता. त्यानंतर तो साठा तिबेटमध्ये हलवण्यात आला.
आता डोकलाममधून भारताने माघार घेतली तरी चीन या प्रकरणी शांत राहणार नाही. आता भारताची माघार हे या प्रश्नाचे उत्तर असू शकत नाही. भारताला त्याच्या कृत्याचे परिणाम भोगावे लागतील, असे चायनीज अॅकॅडमी ऑफ सोशल सायन्सच्या नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ इंटरनॅशनल स्ट्रॅटर्जीच्या निर्देशकांच्या हवाल्याने ग्लोबल टाइम्सने लिहिले आहे. तसेच हत्यारे आणि सैन्य अधिकाऱ्यांच्या गुणवत्तेच्याबाबतीत चीन भारताला वरचढ आहे, असाही दावा करण्यात आला आहे.
दरम्यान, चिनी सैनिकांनी लडाखमध्ये भारतीय हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न केल्यामुळे निर्माण झालेल्या वादाची आपल्याला अजिबात कल्पना नाही असे चीनकडून सांगण्यात आले. सीमेवर शांतता आणि स्थैर्य टिकवण्यासाठी आपण कटीबद्ध आहोत असे चीनने म्हटले आहे. सीमेवर सर्तक असलेल्या जवानांनी मंगळवारी चिनी सैनिकांचा घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावला. यावेळी बाचाबाचीचे पर्यावसन दगडफेकीच्या घटनेत झाले.
दोन्ही बाजूकडून झालेल्या दगडफेकीमध्ये दोन्ही देशांचे जवान किरकोळ जखमी झाले. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्त्या ह्यु च्युनयींग यांना यासंबंधी विचारले असता आपल्याला यासंबंधी काहीही माहिती नसल्याचे उत्तर त्यांनी दिले. नियंत्रण रेषेजवळ नेहमीच चीनचे सैनिक गस्त घालत असतात असे त्यांनी च्युनयींग यांनी सांगितले. सीमारेषेसंबंधी दोन्ही देशांमध्ये जे करार आहेत त्याचे पालन करण्याची आम्ही भारताला विनंती करत आहोत असे त्या म्हणाल्या.