या देशात मासिक पाळी आली की महिलेला काढतात घराबाहेर
By admin | Published: March 4, 2017 01:39 PM2017-03-04T13:39:09+5:302017-03-04T15:12:54+5:30
मासिक पाळीबद्दल असलेलं अज्ञान म्हणा किंवा माहित असूनही ते स्वीकारण्याची तयारी नसल्यामुळे, पण सर्व त्रास भोगावा लागतो तो महिलांनाच.
Next
>ऑनलाइन लोकमत
काठमांडू, दि. 4 - स्त्रियांच्या आयुष्यातील एक महत्वाचा भाग असलेली आणि त्यांना नवनिर्मितीचा आनंद देणा-या मासिक पाळीचा विषय निघाला की आजही लोक नाक मुरडताना दिसतात. मासिक पाळीबद्दल असलेलं अज्ञान म्हणा किंवा माहित असूनही ते स्वीकारण्याची तयारी नसल्यामुळे, पण सर्व त्रास भोगावा लागतो तो महिलांनाच. आजही आपल्याकडे महिलेला मासिक पाळी आली की तिच्यावर अनेक बंधनं घातली जातात. जसं की घरात बाजूला बसवणं, पूजा-अर्चा करू न देणं, देवळात जाऊ नं देणं, अशा अनेक प्रथा-परंपरा आजही पाळल्या जातात. हे फक्त भारतातच नव्हे तर जगभरात घडत असतं. अशीच एक अनिष्ट प्रथा नेपाळमध्येही सुरु आहे.
नेपाळमध्ये जेव्हा एखाद्या महिलेला मासिक पाळी येते तेव्हा तिला घरापासून दूर एका झोपडीत जाऊन राहावं लागतं. जोपर्यंत पाळी संपत नाही तोपर्यंत ती घरी येऊ शकत नाही. नेपाळमध्ये या प्रथेला 'चौपडी' असं म्हटलं जातं. नेपाळमध्ये एका कायद्याद्वारे ही प्रथा बंद करण्यात आली होती. पण अंधविश्वास आणि धार्मिक - सामाजिक मान्यतांमुळे अजूनही मोठ्या प्रमाणात ही प्रथा सुरु आहे. संसदेत एका नव्या कायद्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला असून या प्रथेला बेकायदेशीर आणि गुन्हा घोषित करण्याची मागणी केली आहे. जर हा कायदा संमत झाला तर या प्रथेचं पालन करणा-यांना कारावास होऊ शकतो.
मासिक पाळी आल्यानंतर घर, कुटुंबापासून महिलेला दूर ठेवण्याची परंपरा जुन्या काळापासून चालत आली आहे. इतकंच काय महिला अन्न आणि पुरुषांना हातदेखील लावू शकत नाहीत. महिलांना अस्पृश्य असल्याप्रमाणेच वागवलं जातं. जनावरांनाही हात लावण्याची मुभा नसते. देऊळ, पूजा, मूर्ती सर्वांपासून दोन हात लांबच राहावं लागतं. काही दिवसांपुर्वी या प्रथेमुळे दोन महिलांचा मृत्यू झाल्याचंही समोर आलं होतं. यामधील एका महिलेने सर्दी झाल्याने झोपडीत शेकोटी पेटवली होती, धुरामुळे गुदरमरुन तिचा मृत्यू झाला.
पश्चिम नेपाळमध्ये राहणा-या पवित्रा गिरी यांनी सांगितलं की, 'असं नाही केलं तर वाईट घटना घडतील असं आम्हाला वाटतं. जर आम्ही या प्रथेचं पालन नाही केलं तर देव नाराज होईल. या प्रथेमुळे आमचं चांगलंच होतं असं आम्हाला वाटतं. त्यामुळेच आम्ही त्याचं पालन करतो. सुरुवातील घराबाहेर एकटी राहताना भीती वाटायची. पण आता सवय झाली आहे'.