एका व्हॉट्सअॅप मेसेजमुळे न्यायालयाने त्याला दिली मृत्युदंडाची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2017 08:41 AM2017-09-17T08:41:02+5:302017-09-17T08:43:13+5:30
एक फॉरवर्ड केलेला मेसेज भविष्यात तुम्हाला कधी आलाच तर वेळीच सावध व्हा! नाहीतर...
लाहोर, दि. 17 : व्हॉट्सअॅप जगात सर्वाधिक वापरले जाणारे मेसेजिंग अॅप आहे. अनेकदा व्हॉट्सअॅपवर येणाऱ्या मेसेजेसची कोणतीही शहानिशा न करता आपण ते ग्रुपमध्ये किंवा मित्र मैत्रिणींना फॉरवर्ड करत असतो. असाच एक फॉरवर्ड केलेला मेसेज भविष्यात तुम्हाला कधी आलाच तर वेळीच सावध व्हा! नाहीतर तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. असेच एकप्रकरण समोर आले आहे. एका अपमानजनक व्हॉट्सअॅप मेसेजमुळे एका व्यक्तीला न्यायालयाने चक्क मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. धर्माबाबत अपमानजनक मेसेजमुळे न्यायालयाने ही सुनावल्याचे सांगण्यात येत आहे.
एका मित्राला व्हॉट्सअॅपवर धर्माबाबत अपमानजनक मेसेज पाठविणाऱ्या व्यक्तीला मृत्यूची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हा मेसेज सेंड केल्यानंतर आरोपी व्यक्तीला संतप्त नागरिकांनी घेरलं. मात्र, त्याने तेथून पळ काढला आणि पोलीस स्टेशन गाठलं.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना पाकिस्तानमधील लाहेर येथे घडली आहे. जेम्स मसीह नावाच्या व्यक्तीने पोलिसांत तक्रार दाखल केली होती की, त्याने व्हॉट्सअॅपवर एक कविता पाठवली होती. त्या कवितेत धर्माचा अपमान करण्यात आला होता. त्यामुळे संतप्त नागरिकांनी त्याच्यावर आपला राग व्यक्त करण्याचा प्रयत्न केला मात्र, त्याने घटनास्थळावरुन पळ काढला.
आरोपी व्यक्तीने पोलिसांत आत्मसमर्पण केलं. त्यानंतर या प्रकरणी न्यायालयात खटला चालला. न्यायालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, जेम्स मसीह याला मृत्युदंडासोबतच आरोपीला 3 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तर, या प्रकरणी जेम्सच्या वकीलांनी तो निर्दोष असल्याचं म्हटलं आहे. त्याला या प्रकरणात अडकविण्यात येत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.