'डोकलाम वाद भारतासाठी एक धडा आहे', चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीने पुन्हा काढली खोड
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2017 04:12 PM2017-08-29T16:12:23+5:302017-08-29T16:13:54+5:30
डोकलाम वादावर तोडगा काढत भारतीय आणि चीनी सैन्याने सिक्कीम बॉर्डरवरुन सहमतीने आपापले सैन्य मागे घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीने पुन्हा एकदा भारताची खोड काढली आहे
बीजिंग, दि. 29 - डोकलाम वादावर तोडगा काढत भारतीय आणि चीनी सैन्याने सिक्कीम बॉर्डरवरुन सहमतीने आपापले सैन्य मागे घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीने पुन्हा एकदा भारताची खोड काढली आहे. भारताने डोकलाम वादातून धडा घ्यावा असं पिपल्स लिबरेशन आर्मीने सांगितलं आहे. त्यांनी यासंबंधी स्टेटमेंट जारी केलं आहे.
'या वादातून भारताने धडा घ्यावा. आपल्यात झालेल्या करारांवर आणि आंतरराष्ट्रीय कायद्याच्या मुलभूत तत्वांशी ठाम राहावं. सोबतच सीमारेषलवर शांतता आणि स्थिरता कायम ठेवण्यासाठी चीनला मदत करावी आणि दोन्ही देशांमधील लष्करात चांगले संबंध निर्माण होण्यासाठी पुढाकार घ्यावा', असं स्टेटमेंटमधून सांगण्यात आलं आहे.
भारत, चीन व भूतान यांच्या सीमा जेथे मिळतात त्या डोकलाम पठारावरून भारत व चीन यांच्यात गेले दोन महिने सुरू असलेला लष्करी तिढा राजनैतिक वाटाघाटींतून सुटण्याचा मार्ग मोकळा झाला असून, त्यानुसार भारताने त्या ठिकाणाहून आपले सैन्य मागे घेण्यास सुरुवात केली आहे.
चीनमध्ये ३ ते ५ सप्टेंबरदरम्यान होणाºया ‘ब्रिक्स’ शिखर परिषदेसाठी पंतप्रधान मोदी जाणार असल्याच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी ही घोषणा केली. सैन्याची ही माघार उभयपक्षी सहमतीने होत असल्याचे भारताने म्हटले असले तरी चीनने मात्र भारताने एकतर्फी सैन्य मागे घेतल्याचा दावा केला. भारतीय लष्कराच्या सूत्रांनी याविषयी अधिक तपशील देण्यास नकार दिला. मात्र सैन्य माघारी घेण्यावर सहमती झाली आहे व त्यानुसार सैन्य मागे घेतले जात आहे, यास या सूत्रांनी दुजोरा दिला.
बीजिंगमध्ये चीनचे परराष्ट्र मंत्रालय, ‘पीपल्स डेली’ व ‘शिन्हुआ’ वृत्तसंस्था तसेच चायना ग्लोबल टेलिव्हिजन या सर्वांनी डोकलामचा तिढा सोडविण्यावर द्विपक्षीय सहमती झाल्याचे जाहीर केले. मात्र त्यांच्या म्हणण्यानुसार फक्त भारताने सैन्य मागे घेतले आहे. सोमवारी दुपारपर्यंत डोकलाम येथून भारताने आपले सर्व सैनिक व लष्करी सामग्री माघारी घेऊन सीमेपलीकडे नेल्याचे चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हुआ चुनयिंग म्हणाले. चीन मात्र या प्रदेशावरील आपले सार्वभौमत्व अधोरेखित करण्यासाठी तेथे सैन्य ठेवून पहारा देतच राहील, असा दावाही त्यांनी केला.
दोन महिन्यांपासून होता तिढा
या सीमेवर भूतानच्या मदतीसाठी भारतीय सैन्य तैनात आहे. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या जवानांनी भूतानच्या हद्दीत सुरू केलेले रस्त्याचे बांधकाम भारतीय सैनिकांनी हस्तक्षेप करून १८ जून रोजी बंद पाडले तेव्हापासून हा तिढा सुरू आहे. तो प्रदेश आपलाच असल्याचा दावा करून चीनने भारतावर घुसखोरीचा आरोप केला होता. तेव्हापासून भारताचे ३५० व चीनचे ३०० सैनिक डोकलाम पठारावर आमने-सामने आहेत.