'डोनाल्ड ट्रम्प आणि किम जाँग उन शाळकरी मुलांसारखे भांडत आहेत'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2017 04:13 PM2017-09-23T16:13:39+5:302017-09-23T16:15:24+5:30

रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लॅव्हरोव्ह यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जाँग उन यांच्यात सुरु असलेली शाब्दिक चकमक म्हणजे शाळकरी मुलांच्या लढाईप्रमाणे असल्याचं सांगितलं आहे

'Donald Trump and Kim Jong are fighting like schoolgirls' | 'डोनाल्ड ट्रम्प आणि किम जाँग उन शाळकरी मुलांसारखे भांडत आहेत'

'डोनाल्ड ट्रम्प आणि किम जाँग उन शाळकरी मुलांसारखे भांडत आहेत'

Next

मॉस्को - रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लॅव्हरोव्ह यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जाँग उन यांच्यात सुरु असलेली शाब्दिक चकमक म्हणजे शाळकरी मुलांच्या लढाईप्रमाणे असल्याचं सांगितलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर कोरियाचा विनाश करण्याची धमकी दिली होती. तर किम जाँग उन याने पलटवार करताना डोनाल्ड ट्रम्प यांची मानसिक स्थिती योग्य नसून म्हातारे असा उल्लेख केला होता. 

बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, सर्गेई लॅव्हरोव्ह यांनी दोन्ही नेत्यांनी आपली शाब्दिक चकमक थांबवणं गरजेचं असल्याचं म्हटलं आहे. ते बोलले आहेत की, 'उत्तर कोरियाच्या हालचालींकडे शांतपणे पाहणं योग्य नाही, मात्र युद्ध छेडणंही योग्य नाही'. यासाठी राजकीय मार्ग स्विकारण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. हा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या प्रक्रियेचा मुख्य भाग आहे असं त्यांनी सांगितलं. 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर कोरियाला ‘पूर्णपणे नष्ट’ करण्याचा आणि शस्त्रास्त्रे कार्यक्रमावरून इराणच्या प्राणघातक राजवटीशी संघर्ष करण्याचा अत्यंत कठोर इशारा दिला होता. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत ट्रम्प यांनी आपल्या पहिल्या कडक भाषा वापरलेल्या भाषणात उत्तर कोरियाला अणू क्षेपणास्त्रांचा कार्यक्रम सुरू न ठेवण्याचा इशारा दिला. उत्तर कोरियाचे नेते किम जोंग-ऊन यांचा उल्लेख ‘रॉकेट मॅन’ असा करून त्याचा देश नष्ट करण्याची धमकी दिली.

‘अमेरिकेकडे प्रचंड शक्ती आणि संयम आहे; परंतु आम्हाला स्वत:चे व किंवा आमच्या मित्रदेशांचे संरक्षण करणे भाग पडले तर उत्तर कोरियाला पूर्णपणे नष्ट करण्याशिवाय आमच्याकडे दुसरा मार्ग नसेल,’ असे ट्रम्प म्हणाले. रॉकेट मॅन हा स्वत:च्या आणि त्याच्या राजवटीच्या आत्मघाती मोहिमेवर आहे, असे सांगून ट्रम्प म्हणाले की, ‘अमेरिका तयार आहे, तिची तयारी आणि ती सक्षम आहे; परंतु आशा आहे की, या सगळ्याची गरज भासणार नाही.’

यानंतर उत्तर कोरियाचे परराष्ट्र मंत्री रि यांग हो यांनी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप यांच्या या धमकीची तुलना कुत्र्याच्या भुंकण्याशी केली होती. यांग हो यांनी न्यू यॉर्क येथे युनायटेड नेशनच्या मुख्यालयाजवळ मीडियाला संबोधित करताना डोनाल्ड ट्रंप यांच्या धमकीची तुलना कुत्र्याच्या भुंकण्याशी केली. ट्रंप यांनी दिलेल्या धमकीबाबत पत्रकारांनी विचारले असता, कुत्रे भुंकत असतात पण हत्ती चालत असतो या म्हणीचा त्यांनी वापर केला. कुत्र्यासारखं भुंकण्याने जर आम्ही घाबरू असं त्यांना वाटत असेल तर ते स्वप्न पाहात आहेत असं यांग हो म्हणाले. 

या महिन्याच्या सुरुवातीला उत्तर कोरियाने सर्वात शक्तिशाली हायड्रोजन बॉम्बची चाचणी केली होती. यामुळे चीनच्या सीमेवर 6.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप आला होता.

हायड्रोजन बॉम्ब म्हणजे काय?

हायड़्रोजन बॉम्ब हा अणुबॉम्बपेक्षा अनेक पटीने संहारक असतो. अणुबॉम्बमध्ये स्फोट घडवण्यासाठी अणुविखंडनाची प्रक्रिया वापरली जाते. तर हायड्रोजन बॉम्बमध्ये केंद्रकीय संमिलन (फ्युजन) प्रक्रियेद्वारे स्फोट घडवून आणला जातो. संमिलनाची प्रक्रिया अणुविखंडनापेक्षा किचकट असते. ही प्रक्रिया सुरू करण्यासाठी मोठ्या प्रमाणात ऊर्जेची आवश्यकता असते. त्यामुळे हायड्रोजन बॉम्बमध्ये संमिलन घडवण्यासाठी अणुस्फोट केला जातो. त्यामुळे हा स्फोट झाल्यानंतर हायड्रोजनची समस्थानिके असलेल्या ड्युटेरियम, ट्रिटीयम यांच्यात शृंखला अभिक्रिया होऊन मोठ्य़ा प्रमाणात ऊर्जा मुक्त होते. शितयुद्धाच्या काळात 1952 साली अमेरिकेने हायड्रोजन बॉम्बचे परीक्षण केले होते. तर 1961 साली रशियाने हायड्रोजन बॉम्बची चाचणी घेतली होती. अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीस जपानमधील हिरोशिमा आणि नागासाकीवर अणुबॉम्ब टाकले होते. मात्र भयंकर संहारक असलेल्या हायड्रोजन बॉम्बचा अद्याप युद्धात वापर करण्यात आलेला नाही. 

Web Title: 'Donald Trump and Kim Jong are fighting like schoolgirls'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.