उत्तर कोरियात भूकंपाचे धक्के, किम जोंगने पुन्हा अणुबॉम्बची चाचणी केली का ?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2017 03:51 PM2017-09-23T15:51:54+5:302017-09-23T16:15:53+5:30
उत्तर कोरियामध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. चीनच्या भूकंपमापक यंत्रानुसार हे भूकंपाचे धक्के 3.4 रिश्टर स्केल तीव्रतेचे आहेत.
बिजींग - उत्तर कोरियामध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. 3.4 रिश्टर स्केल तीव्रतेचे हे भूकंपाचे धक्के आहेत. उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उनने पुन्हा अणुबॉम्बची चाचणी केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
स्फोटामुळे हे हादरे जाणवले असे चीनच्या भूकंप नेटवर्क सेंटरचे म्हणणे आहे. उत्तर कोरियाने सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला जिथे अणूबॉम्बची चाचणी केली होती. त्याच भागात पुन्हा हे हादरे जाणवले आहेत. भूकंपाचा केंद्रबिंदू भूगर्भात नसल्यामुळे स्फोटातूनच हे हादरे निर्माण झाल्याचे चीनचे म्हणणे आहे.
दक्षिण कोरिया या भूकंपाच्या धक्क्याचे विश्लेषण करत आहे. प्राथमिक दृष्टया हा नैसर्गिक भूकंप असल्याचे दिसत आहे असे दक्षिण कोरियाने म्हटले आहे. सध्या उत्तर कोरिया आणि अमेरिकेमध्ये शाब्दीक लढाई सुरु आहे.
उत्तर कोरियाने हायड्रोजन बॉम्ब टाकण्याची धमकी दिल्यानंतर अमेरिकेने अत्यंत कठोर शब्दात निर्वाणीचा इशारा दिला आहे. उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन एक वेडा माणूस आहे. आपल्या देशातील लोक उपाशी मरतील याची त्याला अजिबात चिंता वाटत नाही. त्यांची हत्या करायलाही तो मागेपुढे पाहत नाही. आम्ही किम जोंग आणि उत्तर कोरियाला कधीही विसरणार नाहीत असा धडा शिकवू असा इशाराच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टि्वट करुन दिला आहे.
उत्तर कोरियाचे परराष्ट्रमंत्री री याँग हो यांनी शुक्रवारी अमेरिकेने आमच्याविरोधात लष्करी कारवाई केली, तर आमचा सर्वात शक्तिशाली हायड्रोजन बॉम्ब प्रशांत महासागरात टाकू', अशी धमकी दिली.उत्तर कोरियाला ताळयावर आणण्यासाठी अमेरिकेने संयुक्त राष्ट्राच्या माध्यमातून निर्बंध आणले आहेत. पण तरीही किंम जोग उन कोणाचेही ऐकायला तयार नाही.
संयुक्त राष्ट्राचे निर्बंध धुडकावून त्याच्या क्षेपणास्त्र चाचण्या सुरुच आहेत. आठवडयाच्या सुरुवातीलाच अमेरिकेच्या लढाऊ विमानांनी कोरियाच्या आकाशात जोरदार युद्ध सराव केला. उत्तर कोरियाने शक्तीशाली हायड्रोजन बॉम्ब पाठोपाठ क्षेपणास्त्र चाचणी केल्यामुळे कोरियन द्विपकल्पात युद्धाचे ढग जमा झाले आहेत. अमेरिकेची चार F-35B स्टेलथ फायटर जेट आणि दोन B-1B बॉम्बर विमाने सरावात सहभागी झाली होती.