म्हणे, झुकरबर्गची बुद्धिमत्ता मर्यादित; 'या' दिग्गजाने उडवली खिल्ली
By sagar.sirsat | Published: July 25, 2017 08:20 PM2017-07-25T20:20:46+5:302017-07-25T21:01:21+5:30
जग बदलू पाहणा-या आणि नवं तंत्रज्ञानाने सर्व सामान्यांच्या जीवनात सुसह्यता आणण्याची स्वप्नं पाहणा-या दोन दिग्गजांमध्ये आता बौद्धिक कुवतीवरून जुंपलीये.
मुंबई, दि. 25 - जग बदलू पाहणा-या आणि नव तंत्रज्ञानाने सर्व सामान्यांच्या जीवनात सुसह्यता आणण्याची स्वप्नं पाहणा-या दोन दिग्गजांमध्ये आता बौद्धिक कुवतीवरून जुंपलीये. ही दोघं दुसरी-तिसरी कोणी नसून चक्क फेसबुकचा सर्वेसर्वा मार्क झुकरबर्ग अन् जगाला वेगाचे वेड लावणारा एलॉन मस्क ही आहेत. झुकरबर्गला आर्टिफिशिअल इंटेलिजन्सबद्दल (कृत्रिम बुद्धिमत्ता) फारसं कळत नसल्याचं...त्याच्याच भाषेत सांगायचं तर लिमिटेड कळत असल्याचं एलॉन मस्कचं म्हणणं आहे.
ख्यातनाम तंत्रज्ञ आणि टेसला या ऑटोमोबाइल कंपनीचे मालक एलॉन मस्क यांनी फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांचं आर्टिफिशिअल इंटेलिजन्स याबाबत असलेलं ज्ञान मर्यादित असल्याची बोचरी टीका ट्विटरद्वारे केली आहे. या निमित्ताने दोघा दिग्गजांमध्ये वादाची ठिणगी पडल्याचं बोललं जात आहे.
मार्क झुकरबर्गला रविवारी फेसबुक लाइव्हदरम्यान एका युझरने प्रश्न विचारला होता. एलोन मस्क यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या एका विधानाबाबत हा प्रश्न होता. भविष्यात सर्वात जास्त धोका हा कृत्रिम बुद्धिमत्तेपासून आहे, असं विधान एलोन मस्क यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये केलं होतं.
भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे अनेकांचे रोजगार हिरावले जातील. रोबोट सर्वकाही करण्यास सक्षम असतील. माणसांपेक्षाही रोबोट उत्तम काम करतील. त्यामुळे अनेकांच्या रोजगारावर गदा येईल, असं मस्क गेल्या महिन्यात एका इंटरव्ह्यूमध्ये म्हणाले होते.
मस्क यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या या विधानाबाबत रविवारी फेसबुक लाइव्हदरम्यान एका युझरने झुकरबर्गला प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना, 'मी या मताशी सहमत नाही, असं विधान करणं अत्यंत बेजबाबदारपणाचं लक्षण आहे. जगाच्या शेवटाबाबत जे लोक अशी विधानं करत आहेत ते चुकीचं आहे', असं झुकरबर्ग म्हणाले.
झुकरबर्ग यांचं हे उत्तर एका युझरने मस्क यांना टॅग करून ट्विटरवर टाकलं. त्यावर मस्क यांनी लागलीच प्रतिक्रिया दिली. ''याबाबत मी झुकरबर्गसोबत बोललोय, त्याचं कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत असलेलं ज्ञान मर्यादित आहे, असं ट्विट मस्क यांनी केलं आहे.
मार्क झुकरबर्ग आणि एलोन मस्क या दोघांना तंत्रज्ञानातील दिग्गज मानलं जातं. मात्र दोघांची किंवा त्यांच्या कंपन्यांची एकमेकांशी दूरपर्यंत कोणतीही स्पर्धा नाही. तरीही दोघा दिग्गजांमध्ये सार्वजनिक स्थरावर सुरू झालेली ही चर्चा आर्टिफिशिअल इंटेलिजन्सबाबत तंत्रज्ञान क्षेत्र काय विचार करतं हे अधोरेखीत करण्यासाठी आणि सर्वांचं लक्ष वेधण्यासाठी पुरेशी आहे. अन् आता इथून पुढे कदाचीत या दोन दिग्गजांमध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्सवरून 'बौद्धिक' स्पर्धा होण्याची शक्यता कोणी नाकारू शकणार नाही.
I've talked to Mark about this. His understanding of the subject is limited.
— Elon Musk (@elonmusk) July 25, 2017