केरळातील ख्रिश्चन धर्मगुरु फादर टॉम यांची अखेर सुटका, दीड वर्षापूर्वी इसिसने केले होते अपहरण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2017 04:40 PM2017-09-12T16:40:31+5:302017-09-12T16:40:31+5:30
इसिसच्या तावडीतून अखेर ख्रिश्चन धर्मगुरु फादर टॉम यांची सुटका झाली आहे. फादर टॉम भारतीय नागरीक आहेत.
नवी दिल्ली, दि. 12 - इसिसच्या तावडीतून अखेर ख्रिश्चन धर्मगुरु फादर टॉम यांची सुटका झाली आहे. फादर टॉम भारतीय नागरीक आहेत. वर्षभरापूर्वी 2016 मध्ये येमेनच्या दक्षिणेकडील अदेन शहरातून इसिसने त्यांचे अपहरण केले होते. फादर टॉम यांच्या सुटकेसाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरु होते. जवळपास 18 महिने फादर टॉम इसिसच्या तावडीत होते. फादर टॉम यांच्या सुटकेमध्ये सुल्तान ऑफ ओमानने महत्वाची भूमिका बजावल्याची माहिती आहे.
मार्च 2016 मध्ये चार बंदुकधारी दहशतवाद्यांनी सेवा केंद्रावर हल्ला करुन फादर टॉम यांचे अपहरण केले होते. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात चार नन ठार, दोन येमेनी महिला कर्मचारी, आठ ज्येष्ठ नागरीक आणि एक सुरक्षा रक्षक ठार झाले होते. काही महिन्यांपूर्वी फादर टॉम यांचा एक व्हिडीओ येमेनी वेबसाईटने प्रसिद्ध केला होता. यामध्ये फादर टॉम यांची प्रकृती खालावल्याचे दिसत होते.
शक्य तितकी मला ते मला चांगली वागणूक देत आहेत. पण आता माझी प्रकृती ढासळत चालली आहे. मला वैद्यकीय मदतीची आवश्यकता आहे असे ते व्हिडीओ संदेशात म्हणाले होते. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी सुद्धा टॉम यांच्या सुटकेबद्दल आनंद व्यक्त केला आहे.
I am happy to inform that Father Tom Uzhunnalil has been rescued.pic.twitter.com/FwAYoTkbj2
— Sushma Swaraj (@SushmaSwaraj) September 12, 2017