हार्वे चक्रीवादळ टेक्सासमध्ये धडकले; अमेरिकेतील १३ वर्षांतील सर्वांत मोठे वादळ, पाच बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 04:45 AM2017-08-29T04:45:42+5:302017-08-29T04:47:44+5:30
हार्वे चक्रीवादळ अमेरिकेच्या टेक्सासमध्ये धडकले असून २१५ किमी प्रति तास या वेगाने आलेल्या या वादळाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. सर्वाधिक फटका रॉकपोर्ट शहराला बसला.
ह्युस्टन : हार्वे चक्रीवादळ अमेरिकेच्या टेक्सासमध्ये धडकले असून २१५ किमी प्रति तास या वेगाने आलेल्या या वादळाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. सर्वाधिक फटका रॉकपोर्ट शहराला बसला. अनेक इमारती कोसळल्या आहेत. मुसळधार पावसानंतर आलेल्या पुरातून शेकडो जणांना वाचविण्यात यश आले आहे. ५ जणांचा मृत्यू झाला आहे. रॉकपोर्टच्या महापौरांनी या वादळापूर्वीच शहरातील नागरिकांना शहरातच थांबावे, असा सल्ला दिला होता. वादळामुळे कॉर्पस् क्रिस्टी शहरात वीज खंडित झाली.
अनेक शहरांमध्ये पाणी तुंबले असून, कित्येक घरेही पाण्याखाली गेली आहेत. बरीच वाहनेही पाण्यात बुडाल्याचे चित्र आहे. अनेक लोक शहर सोडून सुरक्षित स्थळी रवाना झाले. टेक्सासच्या एकचतुर्थांश भागाला या वादळाचा फटका बसला आहे. टेक्सासच्या काही भागांत रेकॉर्ड ५० इंची पाऊस झाला आहे. १८ काउंटीतील ६८ लाख नागरिक या वादळाने प्रभावित झाले आहेत. ह्युस्टन आणि उपनगरांत ५० इंच एवढा पाऊस पडू शकतो, असा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण ह्युस्टनमध्ये २५ इंच तर उपनगरात २७ इंच पाऊस झाला आहे.
अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेतील १३ वर्षांतील सर्वांत मोठ्या चक्रीवादळाची पाहणी मंगळवारी करणार आहेत. व्हाइट हाउसने सांगितले की, सरकारी अधिकाºयांशी आम्ही समन्वय साधून आहोत. मदतकार्य वेगाने सुरू आहे. लोकांची सुरक्षा हीच आमची प्राथमिकता आहे. टेक्सास आणि लुइसियाना येथे सरकारचे ५ हजार लोक मदत कार्य करत आहेत.
२०० भारतीय विद्यार्थी ह्युस्टन पुरात अडकले
टेक्सास राज्याच्या ह्युस्टन शहराच्या विद्यापीठात शिकणारे २०० भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. त्यांना सुखरूप बाहेर काढण्याचे सर्व प्रयत्न भारतीय वाणिज्य दूतावासातर्फे करण्यात येत आहेत, अशी माहिती परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी सोमवारी टिष्ट्वटरवरून दिली. शालिनी आणि निखिल भाटिया या दोन विद्यार्थ्यांना अतिदक्षता विभागात हलविण्यात आले. त्यांच्या कुटुंबीयांना लवकरात लवकर तेथे जाता यावे, याचीही व्यवस्था केली जात आहे. भारताचे महावाणिज्यदूत निरुपम राय मदत कार्यावर लक्ष ठेवून आहेत.