Mother of All Deals म्हणजे काय? भारत-युरोप करारातून कोणाला काय फायदा? जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 17:27 IST2026-01-21T17:26:47+5:302026-01-21T17:27:59+5:30
What Is Mother of All Deals: भारत आणि युरोपमधील एका महत्त्वाकांक्षी कराराच्या घोषणेने जगाचे लक्ष वेधून घेतले आहे.

Mother of All Deals म्हणजे काय? भारत-युरोप करारातून कोणाला काय फायदा? जाणून घ्या...
What Is Mother of All Deals: स्वित्झर्लंडमधील दावोस येथे World Economic Forum (WEF) चे आयोजन करण्यात आले आहे. या यात जगभरातील अनेक देशांचे नेते आणि उद्योगपती सहभागी होत आहेत. याच पार्श्वभूमीवर, भारत आणि युरोपमधील एका महत्त्वाकांक्षी कराराच्या घोषणेने जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. हा करार केवळ एक साधा व्यापार करार नसून, त्याला ‘मदर ऑफ ऑल डील्स’ असे संबोधले जात आहे. जागतिक बाजारपेठेतील अस्थिरता आणि भारतासमोरील आर्थिक आव्हानांच्या पार्श्वभूमीवर हा करार दोन्ही खंडांसाठी काय बदल घडवू शकतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दावोसमध्ये ऐतिहासिक घोषणा
दावोस येथे सुरू असलेल्या WEF मध्ये युरोपियन आयोगाच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयेन यांनी भारत आणि EU यांच्यातील मुक्त व्यापार करार (FTA) अंतिम टप्प्यात असल्याची ऐतिहासिक घोषणा केली. हा करार 27 जानेवारीला, म्हणजेच प्रजासत्ताक दिनाच्या दुसऱ्या दिवशी औपचारिकरित्या स्वाक्षरीसाठी पुढे येण्याची शक्यता आहे. हा करार केवळ व्यापारापुरता मर्यादित नसून, रणनीतिक सहकार्य, गुंतवणूक आणि जागतिक आर्थिक संतुलनाच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
Fresh from #WEFDavos:
— EU in India (@EU_in_India) January 20, 2026
"we are on the cusp of a historic trade agreement. Some call it the mother of all deals. One that would create a market of 2 billion people.." President @vonderleyen
President @antoniocostapm & @vonderleyen will visit India Jan 25-27. 🇪🇺🤝🇮🇳#EUIndiapic.twitter.com/JeET60BwwS
‘मदर ऑफ ऑल डील्स’ म्हणजे काय?
भारत-युरोप मुक्त व्यापार कराराला ‘मदर ऑफ ऑल डील्स’ असे संबोधले जाण्याचे कारण म्हणजे, हा करार २ अब्जांहून अधिक लोकसंख्येच्या बाजारपेठेला जोडतो. जागतिक GDP च्या जवळपास २५ टक्के वाट्याचा यात समावेश आहे. या करारामुळे भारतातील संरक्षण, तंत्रज्ञान, फार्मास्युटिकल्स, आयटी, कृषी अशा प्रमुख क्षेत्रांना मोठी चालना मिळेल. युरोपला या माध्यमातून ‘फर्स्ट मूव्हर अॅडव्हान्टेज’ मिळणार असून, भारतीय बाजारात लवकर प्रवेश करण्याची संधी मिळणार आहे. भारताचे वाणिज्य मंत्री पीयूष गोयल आणि युरोपियन नेतृत्वाने या कराराला आर्थिक व रणनीतिक दृष्टिकोनातून निर्णायक पाऊल म्हटले आहे.
भारताला काय फायदे?
या कराराचा सर्वाधिक फायदा भारतीय उद्योगांना होणार आहे. युरोपियन बाजार खुला झाल्यामुळे कापड, पादत्राणे, रत्न व दागिने यांच्या निर्यातीला चालना, लघु व मध्यम उद्योगांमध्ये रोजगारनिर्मिती, संरक्षण, तंत्रज्ञान उत्पादन आणि सेवा क्षेत्राला नवी दिशा मिळेल. तज्ज्ञांच्या मते, हा करार भारताला जागतिक उत्पादन व सेवा केंद्र म्हणून अधिक बळकट करू शकतो.
युरोपला काय मिळणार?
युरोपसाठी हा करार भारतीय बाजारात थेट प्रवेशाचा मार्ग मोकळा करतो. ऑटोमोबाईल, पेय पदार्थ, तांत्रिक उपकरणे यांसाठी भारत मोठी बाजारपेठ आहे. हा करार गुंतवणूक, रोजगारनिर्मिती आणि आर्थिक स्थैर्यासाठी युरोपसाठीही फायदेशीर ठरणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम
या कराराचा प्रभाव भारत आणि युरोपपुरताच मर्यादित राहणार नाही. अमेरिका व इतर भागांतील आर्थिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर भारत-युरोप एक स्थिर आर्थिक भागीदारी म्हणून पुढे येतील. जागतिक व्यापार धोरणे, पुरवठा साखळी आणि गुंतवणूक निर्णयांवर परिणाम होईल. गुंतवणूकदारांसाठी हा करार एक स्पष्ट संकेत आहे की, भारत आणि युरोप भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेसाठी एकत्रित रणनीती आखत आहेत.