अमेरिकेतील हार्वे वादळात भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू, २०० भारतीय विद्यार्थी अडकले
By पवन देशपांडे | Published: August 30, 2017 12:39 PM2017-08-30T12:39:43+5:302017-08-30T12:41:32+5:30
अमेरिकेतील टेक्सास प्रांतात आलेल्या भयंकर हार्वे वादळाने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, एका २४ वर्षीय भारतीय विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला आहे
ह्युस्टन, दि. 30 - अमेरिकेतील टेक्सास प्रांतात आलेल्या भयंकर हार्वे वादळाने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, एका २४ वर्षीय भारतीय विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला आहे. ह्युस्टन येथे या वादळात आतापर्यंत २०० विद्यार्थी अडकलेले आहेत.
टेक्सासच्या एअँडएम विश्वविद्यालयात निखिल भाटिया शिकत होता. तो आपल्या मैत्रिणीसोबेत शनिवारी ब्रायन तलावात पोहण्यासाठी गेला होता. मात्र, त्याचा बुडून मृत्यू झाला. त्याच्या मैत्रिणीची प्रकृती गंभीर आहे. भारतीय दूतावासाच्या अधिका-यांनी सांगितले की, निखिल भाटियाच्या घरच्यांशी आम्ही संपर्कात आहोत. तसेच त्याच्या मैत्रिणीला ज्या रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे त्यांच्याशीही संपर्क ठेवून होतो. निखिल भाटिया हा मूळचा जयपूरचा आहे. तर त्याची मैत्रीण शालिनी सिंह नवी दिल्ली येथील रहिवासी आहे.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार, निखिल आणि त्याची मैत्रिण तलावात पोहत होते. मात्र अचानक पाणी वाढले आणि पाण्याचा वेगही वाढला. त्यात ते खेचले गेले. त्यांच्यासोबत असलेल्या इतर मित्रांनी स्थानिक पोलिसांना मदतीसाठी बोलावल्यानंतर निखिल आणि त्याच्या मैत्रिणीला बाहेर काढण्यात आले. मात्र तोपर्यंत निखिलचा मृत्यू झाला होता.
अमेरिकेतील गेल्या 13 वर्षांतील सर्वांत मोठे वादळ
गेल्या तेरा वर्षांमध्ये अमेरिकेत एवढे महाभयंकर वादळ धडकले नव्हते. हार्वे वादळाचा तडाका टेक्सास या प्रांताला मोठ्या प्रमाणात बसला आहे. त्यात तब्बल 1.3 कोटी लोक प्रभावित झाले असून, अनेकांची घरे कोसळली आहेत. रस्त्यावरील खांब आणि झाडेही उन्मळून पडली आहेत. अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. लाखो लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे.
@cgihou contact point regarding Indians in distress #HurricaneHarvey . @AdhanaIfs & Consul RD Joshi +18322311988 pic.twitter.com/rdJNI5YeGx
— Anupam Ray (@anupamifs) August 29, 2017
२०० भारतीय विद्यार्थी वादळात अडकले
टेक्सास राज्याच्या ह्युस्टन शहराच्या विद्यापीठात शिकणारे २०० भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. त्यांना सुखरूप बाहेर काढण्याचे सर्व प्रयत्न भारतीय वाणिज्य दूतावासातर्फे करण्यात येत आहेत. भारताचे महावाणिज्यदूत अनुपम राय यांनीही आम्ही टेक्सासमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या मदतीसाठी इथे असल्याचे दिलासा देणारे ट्विट केले आहे. ह्युस्टनमधील स्थानिक रहिवासीही भारतीयांना मदत करत आहे.