आता बस्स झाले! पश्चात्ताप; पाकला ट्रम्प यांचा सज्जड दम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 01:35 AM2018-01-02T01:35:26+5:302018-01-02T01:35:45+5:30
दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी अमेरिकेने पाकिस्तानला भरभरून मदत केली पण त्याच्या बदल्यात पाकिस्तानकडून अमेरिकेला फक्त खोटारडेपणा आणि फसवणुकच मिळाली, असे खडे बोल सुनावत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला अमेरिकेकडून दिली जाणारी २५५ दशलक्ष डॉलरची वार्षिक मदत बंद करण्याचे संकेत सोमवारी दिले.
वॉशिंग्टन : दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी अमेरिकेने पाकिस्तानला भरभरून मदत केली पण त्याच्या बदल्यात पाकिस्तानकडून अमेरिकेला फक्त खोटारडेपणा आणि फसवणुकच मिळाली, असे खडे बोल सुनावत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला अमेरिकेकडून दिली जाणारी २५५ दशलक्ष डॉलरची वार्षिक मदत बंद करण्याचे संकेत सोमवारी दिले.
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी ट्रम्प यांनी आजवर अमेरिकेच्या कोणाही राष्ट्राध्यक्षाने वापरली नाही अशी कडक भाषा वापरत पाकिस्तानला सज्जड इशारा देणारे टिष्ट्वट केले. पाकवर कृतघ्नपणाचा ठपका ठेवण्यासोबत अमेरिकेचा पश्चात्तापही ट्रम्प यांनी ध्वनित केला. पाकिस्तान दहशतवाद्यांना आश्रय देते असा आरोप करत ट्रम्प यांनी लिहिले की, शेजारच्या अफगाणिस्तानात अमेरिका ज्या दहशतवाद्यांच्या मागावर आहे त्यांना पकडण्यास मदत करण्याऐवजी पाक त्यांना आश्रय देते.
ट्रम्प यांच्या या टिष्ट्वटमधील ‘आता बस्स झाले’ (नो मोअर) हे शवटचे शब्द मोठे सूचक मानले जात आहेत. पाकिस्तानच्या दुटप्पी वागण्याने अमेरिकेची सहनशीलता संपत आली आहे व पाकिस्तानला दिली जाणारी २५५ दशलक्ष डॉलरची वार्षिक मदत बंद करण्याच्या निर्णयाप्रत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प येत चालले आहेत, अशा बातम्या गेले काही दिवस येत होत्या.
ज्याला संयुक्त राष्ट्र संघाने दहशतवादी ठरविले आहे व ज्याच्या डोक्यावर अमेरिकेने १० दशलक्ष डॉलरचे बक्षिस जाहीर केले आहे त्यास पाकिस्तानकडून दिली जाणारी वागणूक ही अमेरिकेची दीर्घकाळची नाराजी पश्चात्तापात परावर्तित होण्याचे ताजे कारण मानले जाते. एवढेच नव्हे तर सईद आता राजकीय पक्ष काढून निवडणुका लढविण्याच्याही उघड हालचाली करत आहे, हे अमेरिकेला खटकते आहे. (वृत्तसंस्था)
गेल्या १५ वर्षांत अमेरिकेने पाकिस्तानला ३३ अब्ज डॉलरहून अधिक आर्थिक मदत करण्याचा मूर्खपणा केला आणि आमचे (अमेरिकेचे) नेते मूर्ख आहेत, असे समजून त्या बदल्यात त्यांच्याकडून आमच्या वाट्याला फक्त खोटारडेपणा आणि फसवणूकच आली. आता बस्स झाले!
भारतासाठी सुवार्ता
अमेरिकेने पाकिस्तानला असे खडे बोल सुनावणे हे भारताच्या दृष्टीने विशेष समाधानाचे आहे. पाकिस्तान दहशतवाद रोखण्याचा निव्वळ देखावा करते आणि प्रत्यक्षात दहशतवादास खतपाणी घालून तो शेजारी देशांतही पसरवते. त्यामुळे अमेरिकेने आर्थिक नाड्या आवळून पाकिस्तानची कोंडी करावी, यासाठी भारताचा नेहमीच आग्रह राहिला आहे. आता तरी अमेरिका प्रत्यक्ष कृती करेल, अशी आशा भारताला वाटत आहे.
इन्शाल्लाह, ट्रम्प यांच्या टिष्ट्वटला आम्ही लवकरच उत्तर देऊ... सत्य समोर आणू... वास्तव आणि आभास यातील फरक जगाला दाखवून देऊ. -ख्वाजा मो. आसिफ,
परराष्ट्रमंत्री पाकिस्तान