किम जोंग यांनी खुलेआम केली एका सेनाधिकाऱ्याची 90 गोळ्या झाडून हत्या, काय आहे कारण?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2018 02:26 PM2018-06-30T14:26:13+5:302018-06-30T14:30:02+5:30
लेफ्टनंट जनरल ह्योंग जू सोंग यांच्यावर सेनेतील जवानांना ठरलेल्या प्रमाणापेक्षा जास्त जेवण आणि इंधन वाटल्याचा आरोप होता.
उत्तर कोरिया : उत्तर कोरियाचे प्रमुख किम जोंग उन यांच्या निर्दयीपणाचं आणखी एक उदाहरण समोर आलं आहे. किम जोंग उन यांनी त्यांच्या सेनेतील एका मोठ्या अधिकाऱ्याला सर्वांसमोर 90 गोळ्या झाडून ठार केले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या अधिकाऱ्याला मारण्याची जबाबदारी 9 लोकांकडे देण्यात आली होती.
लेफ्टनंट जनरल ह्योंग जू सोंग यांच्यावर सेनेतील जवानांना ठरलेल्या प्रमाणापेक्षा जास्त जेवण आणि इंधन वाटल्याचा आरोप होता. त्यासोबतच त्यांना आपल्या अधिकारांचा गैरवापर केल्याप्रकरणी देशद्रोही ठरवण्यात आले होते. अशाप्रकारची घटना पहिल्यांदाच झालेली नाहीये. याआधी किम यांच्या एका बैठकीत झोपल्यामुळे रक्षा प्रमुख ह्योंग योंग यांनाही ठार करण्यात आले होते.
मीडिया रिपोर्टनुसार, सेनेचे अधिकारी ह्योंग यांना राजधानी प्योंगयोंग येथील सेनेच्या अकॅडमीमध्ये शिक्षा देण्यात आली. ह्योंग यांनी 10 एप्रिल रोजी सॅटेलाईट लॉन्चिंग स्टेशनचं निरीक्षण केलं होतं. त्यावेळी ते जवानांना म्हणाले होते की, आता आपण अण्वस्त्र आणि रॉकेट तयार करण्यासाठी उपाशी राहू शकत नाही. या अधिकाऱ्यांनी जवानांच्या कुटूंबियांना इंधऩ आणि जेवण देण्याचा उल्लेख केला होता.
ही बातमी किम जोंग यांना कळाल्यावर जीवे मारण्याची शिक्षा त्यांना देण्यात आली. याआधीही किम यांनी अनेकांना अशाप्रकारची शिक्षा सुनावली आहे. 2013 मध्ये आपल्याच एका नातेवाईकाला किम यांनी निर्दयीपणे मारले होते.