कोरियन द्विपकल्पातील तणाव वाढला, अमेरिकी लढाऊ विमानांनी केले उड्डाण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2017 08:39 PM2017-12-06T20:39:25+5:302017-12-06T20:42:29+5:30
उत्तर कोरिया आणि अमेरिकेमधील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. दोन्ही देशांकडून एकमेकांना धमक्या देण्याचे सत्र सुरू असून, उत्तर कोरियाचा हुकूमशहा वारंवार शक्तिप्रदर्शन करून आपल्या विरोधी देशांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे.
सोल - उत्तर कोरिया आणि अमेरिकेमधील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. दोन्ही देशांकडून एकमेकांना धमक्या देण्याचे सत्र सुरू असून, उत्तर कोरियाचा हुकूमशहा वारंवार शक्तिप्रदर्शन करून आपल्या विरोधी देशांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. आता प्योंगयोंगवर दबाव आणण्यासाठी अमेरिका आणि दक्षिण कोरियाने युद्धसरावास सुरुवात केली आहे. दरम्यान, आज या कवायतींमध्ये अमेरिकेची लढाऊ बी-१बी विमाने सहभागी झाली होती. दरम्यान अमेरिकेने उचललेल्या या पावलानंतर उत्तर कोरिया बिथरला असून, याचे गंभीर परिणाम भोगण्याची धमकी त्यांनी दिली आहे.
उत्तर कोरियाने या युद्धसरावाविरोधाक तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हा युद्धसराव कोरियव द्विपकल्पाला युद्धाच्या दिशेने घेऊन जाईल, असे उत्तर कोरियाने म्हटले आहे. अमेरिकेच्या विमानांनी गुआम येईल हवाईहद्दीतून उड्डाण केले होते. या संयुक्त सरावामध्ये अमेरिकेची एफ-२२ आणि एफ-३५ स्टील्थ फायटर विमाने सहभागी झाली आहेत. काही दिवसांपूर्वी उत्तर कोरियाने केलेल्या क्षेपणास्त्र चाचणीनंतर हा युद्धसराव करण्यात येत आहे.
उत्तर कोरियाने वॉसाँग-15 या आपल्या नव्या आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राच्या चाचणीचे फोटो प्रसिद्ध करून अमेरिकेच्या कुठल्याही शहरावर हल्ला करण्यास हे क्षेपणास्त्र सक्षम असल्याचा दावाही केला होता. उत्तर कोरियातील सत्ताधारी पक्षाच्या वर्तमानपत्रात हे फोटो प्रसिद्ध करण्यात आले होते. फोटो प्रसिद्ध होताच अमेरिकेसह उत्तर कोरियाच्या विरोधात असणा-या देशांच्या शास्त्रज्ञांनी हे क्षेपणास्त्र किती घातक ठरु शकते त्याचा अभ्यास करण्यास सुरुवात केली होती.
तज्ञांच्या म्हणण्यानुसार वॉसाँग-15 हे यापूर्वीच्या क्षेपणास्त्राच्या तुलनेत आकाराने मोठे आणि टेक्नोलॉजीमध्ये अधिक सरस आहे. उत्तर कोरियाने ही चाचणी करताना आपल्याच देशात बनवलेल्या मोबाइल लाँचरचा उपयोग केला. शास्त्रज्ञांनी क्षेपणास्त्राच्या रेंजबद्दल मात्र शंका उपस्थित केली आहे.
दरम्यान. वॉसाँग-15 या आपल्या नव्या आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राच्या चाचणीनंतर उत्तर कोरियामध्ये कौतुक सोहळा सुरु होता. उत्तर कोरियाच्या किम संग चौकात शुक्रवारी वॉसाँग-15 क्षेपणास्त्र चाचणीच्या यशाचे जंगी सेलिब्रेशन करण्यात आले.
उत्तर कोरियातील सत्ताधारी पक्षाचे मुखपत्र असलेल्या रोडाँग सिनमन या वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर या सेलिब्रेशनचे फोटो प्रसिद्ध करण्यात आले होते. उत्तर कोरियाच्या दिवंगत नेत्यांचे फोटो लावून या संपूर्ण चौकाची सजावट करण्यात आली होती. किम संग चौकात जमलेल्या नागरीकांची नाचगाणी एकूणच आंनदोत्सव सुरु होता.