कोरियन द्विपकल्पात अमेरिकेच्या शक्तीशाली B-1B बॉम्बर विमानांचा जोरदार युद्ध सराव
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2017 01:20 PM2017-11-03T13:20:56+5:302017-11-03T13:31:50+5:30
अमेरिकेच्या गुआममधल्या अँडरसन एअर फोर्स तळावरुन गुरुवारी दोन B-1B बॉम्बर विमानांनी आकाशात झेप घेतली.
सेऊल - उत्तर कोरियाबरोबरचा तणाव वाढलेला असताना अमेरिकेच्या शक्तीशाली सुपरसॉनिक B-1B बॉम्बर विमानांनी दक्षिण कोरियाच्या आकाशात उड्डाण केले. यावेळी जपान आणि दक्षिण कोरियाची फायटर विमानेही युद्ध सरावात सहभागी झाली होती. अमेरिकेच्या गुआममधल्या अँडरसन एअर फोर्स तळावरुन गुरुवारी दोन B-1B बॉम्बर विमानांनी आकाशात झेप घेतली. या दोन्ही फायटर विमानांनी दक्षिण कोरिया आणि पश्चिम जपानच्या हद्दीत प्रवेश केल्यानंतर त्या देशांची फायटर विमाने सरावामध्ये सहभागी झाली असे अमेरिकेच्या पॅसिफिक एअर फोर्सने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
कोरियन द्विपकल्पातील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. उत्तर कोरिया आणखी एका क्षेपणास्त्र चाचणीची तयारी करत आहे असे वृत्त दक्षिण कोरियाच्या गुप्तचर खात्याने दिले आहे. उत्तर कोरियाने तीन सप्टेंबरला शक्तीशाली हायड्रोजन बॉम्बची चाचणी केल्यानंतर हा तणाव आणखी वाढला. उत्तर कोरियाकडून सातत्याने अमेरिकेला युद्धाची धमकी दिली जात आहे. त्यामुळे अमेरिकेनेही उत्तर कोरियावर दबाव आणण्यासाठी अशा प्रकारचा युद्ध सराव सुरु केला आहे.
सप्टेंबर महिन्यातही अमेरिकेच्या फायटर विमानांनी दक्षिण कोरियाच्या लढाऊ विमानांसोबत सराव केला. यावेळी अमेरिकेची चार F-35B स्टेलथ फायटर जेट आणि दोन B-1B बॉम्बर विमाने सरावात सहभागी झाली होती. उत्तर कोरियानवे बेजबाबदारपणे जी शस्त्रास्त्रांची स्पर्धा चालवली आहे ती तात्काळ बंद करावी अन्यथा उत्तर कोरियाला गंभीर परिणाम भोगावे लागतील असा वारंवार अमेरिकेकडून इशारा देण्यात येत आहे. तरीही उत्तर कोरियाच्या वर्तनात काहीही फरक पडलेला नाही. उत्तर कोरियावर जरब बसवण्यासाठी अशा प्रकारचा सराव सुरु आहे. उत्तर कोरियाने सहाव्यांदा अणूचाचणी केली तसेच जपानच्या दिशेने दोनदा क्षेपणास्त्र डागले त्यानंतर कोरियन द्विपकल्पातील तणावात अधिकच भर पडली.
उत्तर कोरियाने फक्त युद्ध जरी पुकारलं तरी होईल लाखो लोकांचा मृत्यू
उत्तर कोरिया अमेरिकेसहित संपुर्ण जगाला अणुबॉम्बची भीती दाखवत आहे. एका रिपोर्टनुसार, जर उत्तर कोरियाने युद्ध पुकारलं, आणि अणुबॉम्ब शस्त्रांचा वापर केला नाही तरी लाखो लोकांचा मृत्यू होईल. परिस्थिती इतकी भयानक असेल की, पहिल्याच दिवशी तीन लाख लोकांचा मृत्यू होईल.