लास वेगसचा हल्ला इसिसचा नव्हे; तो माथेफिरुच, हॉटेलच्या खोलीत सापडल्या २३ बंदुका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 04:00 AM2017-10-04T04:00:09+5:302017-10-04T04:00:35+5:30
अमेरिकेला हादरवणारा लास वेगस येथील हल्ला इसिसने केला नसून हल्लेखोर माथेफिरूच असल्याचे अमेरिकन गुप्तचर संस्था एफबीआयने सांगितले. इसिसने हा हल्ला केल्याचे कोणतेही पुरावे हाती लागलेले नाहीत
मेघनाद बोधनकर
लास वेगस/सॅन होजे : अमेरिकेला हादरवणारा लास वेगस येथील हल्ला इसिसने केला नसून हल्लेखोर माथेफिरूच असल्याचे अमेरिकन गुप्तचर संस्था एफबीआयने सांगितले. इसिसने हा हल्ला केल्याचे कोणतेही पुरावे हाती लागलेले नाहीत, असेही एफबीआयने म्हटले आहे.
संगीत समारंभात गोळीबारी करून ५९ जणांचा बळी घेणाºया स्टिफन पॅडॉक या हल्लेखोराजवळ ‘बम्प स्टॉक’ नावाचे एक असे उपकरण होते जे सेमी आॅटोमॅटिक हत्याराचे रूपांतर पूर्ण आॅटोमॅटिक हत्यारात करू शकते. त्यातून प्रतिमिनिट ४०० ते ८०० राऊंड अशा गोळ्या चालतात. सेमी आॅटोमॅटिकमध्ये एक गोळी चालविण्यासाठी एकदा ट्रिगर दाबण्याची गरज असते, तर पूर्ण आॅटोमॅटिक हत्यारात एकदा ट्रिगर दाबल्यानंतर रायफलमधील पूर्ण गोळ्या संपेपर्यंत ते थांबत नाही.
हल्लेखोर स्टिफन पॅडॉक यांच्या हॉटेलमधील खोलीत २३ बंदुका मिळाल्या आहेत. पॅडॉककडे दोन बम्प स्टॉक होते. या गोळीबारानंतर हल्लेखोराने स्वत:ला संपविले. त्याच्या घरातूनही बंदुका, स्फोटके आणि शस्त्रसाठा जप्त केला आहे. त्याच्या नेवाडाच्या मेक्वाइट येथील घरी झडती घेतली असता १८ बंदुका, काही स्फोटके आणि दारूगोळा सापडला. घरात काही इलेक्ट्रॉनिक उपकरणेही सापडली आहेत.
या घटनेनंतर भारतीय-अमेरिकी संसद सदस्यांनी शस्त्रास्त्र नियंत्रण कायद्यात बदलाची मागणी केली आहे. प्रमिला जयपाल यांनी म्हटले आहे की, निर्दोष लोकांचे यात बळी जात आहेत. लोकांना मरताना
पाहून आता अमेरिकी लोकही थकले आहेत.
सिडनी : या हल्लेखोराची एक सहयोगी महिला म्हणून ६२ वर्षीय मारिलोऊ डॅनली यांच्याकडे बघितले जाते आहे, पण या हल्ल्याच्या वेळी त्या देशाबाहेर होत्या. अमेरिकी अधिकारी आमच्या संपर्कात असल्याचे आॅस्ट्रेलियाच्या विदेशमंत्री जुली बिशप यांनी सांगितले. या महिलेचा आयडी हॉटेलच्या बुकिंगसाठी वापरण्यात आला होता, असे सांगण्यात येत आहे. मारिलोऊ सध्या फिलिपीन किंवा जपानमध्ये असल्याचे समजते.